होमपेज › Solapur › पंढरीत दहा लाखांवर वैष्णव

पंढरीत दहा लाखांवर वैष्णव

Published On: Jul 22 2018 11:59PM | Last Updated: Jul 22 2018 11:59PMपंढरपूर : सिद्धार्थ ढवळे

 मराठा-धनगर आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर तणावग्रस्त झालेल्या आषाढी एकादशीच्या महापूजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार नाहीत. आंदोलकांच्या भावनांचा विचार करून आपण महापूजेला येणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दरम्यान, आज (दि. 23 जुलै रोजी) साजर्‍या होत असलेल्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 10 लाखांंवर वैष्णव भक्‍तांची मांदियाळी पंढरीत जमली आहे. शासकीय महापूजा दर्शन रांगेतील मानाच्या वारकरी दाम्पत्यांच्या हस्ते होणार आहे. 

 जाईन गे माये तया पंढरपुरा,
भेटेन माहेरा आपुलिया!

 या सासूरवाशिणीच्या ओढीने गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पायी चालत राज्याच्या विविध भागांतून आलेल्या वारकर्‍यांनी पंढरीनगरी गजबजली आहे.  ऊस, वारा, पावसाचा मारा झेलून सुमारे 10 लाखांवर भाविक रविवारी पंढरीत दाखल झाले आहेत. दरम्यान, गेल्या पाच-सहा दिवसांपासून मराठा, धनगर, महादेव कोळी समाजाच्या आरक्षण आंदोलनामुळे संपूर्ण पंढरीसह राज्याभरात तणावाची परिस्थीती होती. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण जाहीर करूनच श्री. विठ्ठलाच्या महापुजेला यावे अन्यथा त्यांना गनिमी काव्याने रोखले जाईल असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यामुळे  पंढरीत अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. सुमारे 8 हजारांवर पोलिसांचा फौजफाटा पंढरीत जागो-जागी तैनात करण्यात आला आहे.  मराठा तसेच धनगर समाजातील 20 कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी एस.टी. बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. मंगळवेढा येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री सुभाष  देशमूख यांना आंदोलकांनी सुमारे 1 तासभर रोखून धरले. त्यावेळी जलसंपदा मंत्री महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने ते शासकीय महापूजेला येणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांना आंदोलकांनी पुढील प्रवासाकरिता सोडले. 
रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत पंढरपूर शहरातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा प्रचंड तणावाखाली होती. मात्र मुख्यमंत्री येणार नाहीत असा संदेश मिळताच संपूर्ण तणाव निवळला असून जिल्ह्यात शांतता प्रस्थापित झाली आहे. 

दरम्यान, वाखरी येथील मुक्‍काम उरकून संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दाखल झाले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यातून हजारो दिंड्या आणि शेकडो पालख्या आषाढी एकादशीसाठी पायी चालत  आल्या आहेत. वैष्णवांचा वर्षातील सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा  सोमवार दि. 23 जुलै  रोजी  साजरा होत असून संत ज्ञानेश्‍वर महाराज,  संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका, संत मुक्‍ताबाई, संत गजानन महाराज, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथांसह शेकडो संतांचे पालखी सोहळे, हजारो दिंड्या आणि 10 लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले  आहेत.  

  गेल्या चार दिवसांपासून पंढरपूर शहरात येणार्‍या भाविकांची संख्या वाढत असून पंढरपूर शहर वारकर्‍यांमुळे गजबजून गेले आहे. सर्वत्र दिंड्या, पताकांचे भार दिसत आहेत आणि टाळ, मृदंगाचा निनाद पंढरीच्या काना-कोपर्‍यात भरलेला आहे. श्री. विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन मंडप, स्टेशन रोड, 65 एकर मैदान, रेल्वे स्टेशन, चंद्रभागानगर बसस्थानकासह पंढरपूर शहर आणि उपनगर भाविकांनी गजबजून गेले आहे. पंढरपूर नगरपालिका, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, आरोग्य विभाग, महसुल विभागसह सर्व शासकीय यंत्रणा आषाढी यात्रा सोहळ्याकरिता सज्ज झाले आहे. चंद्रभागा वाळवंट, 65 एकर पालखी तळ, मंदिर परिसर सर्वत्र हरिनामाजा गजर सुरू असून पंढरी नगरी विठू नामाच्या जयघोषाने चैतन्यमय झाली आहे.