Mon, Mar 25, 2019 17:42होमपेज › Solapur › अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्‍न ऐरणीवर

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्‍न ऐरणीवर

Published On: Feb 27 2018 8:20AM | Last Updated: Feb 26 2018 10:09PMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

अंबाजोगाई जिल्हा होणारच, या अनुषंगाने  बांधण्यात आलेल्या सुसज्ज व टोलेजंग इमारतींना जिल्ह्याची प्रतीक्षा लागली आहे. जिल्हा निर्मितीसाठी गेल्या तीस वर्षांपासून अंबाजोगाईकरांच्या कोपराला गुळ लावला जात आहे. जिल्ह्याचा प्रश्‍न निवडणुकीत फोकस करून निवडणुका जिंकल्या. मात्र तीन दशकानंतरही अंबाजोगाईची जिल्हानिर्मिती झाली नाही. आता हा प्रश्‍न ऐरणीवर आला असून त्यासाठी उपोषणे, आंदोलने व रास्ता रोको करून प्रशासनाला जिल्हा घोषीत करण्यासाठी भाग पाडले जात आहे. परंतु राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्यानेच अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे घोंगडे भिजत पडले असल्याचे बोलले जात आहे. 

अंबाजोगाई जिल्हा निर्मिती झाल्यास अंबाजोगाई, परळी, केज, धारूर, माजलगाव व वडवणी या सहा तालुक्यांचा समावेश असणार आहे. सहा तालुक्याची मिळून अंदाजे बारा लाख लोकसंख्या राहील. सहाही तालुक्यातील नागरिकांना अंबाजोगाई हे जिल्ह्याचे ठिकाण बीडपेक्षा अत्यंत कमी अंतरावर असणार आहे. सध्या  बीडला जाऊन यायचे म्हटले तर अख्खा दिवस घालवावा लागतो. त्याचबरोबर पैसा खूप खर्च होतो. 

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, स्व. विलासराव देशमुख, स्व. गोपीनाथराव मुंडे, खा. शरद पवार अशी जिल्हानिर्मितीचे आश्‍वासन देणार्‍या मातब्बरांची मोठी यादी आहे. स्व.डॉ. विमलताई मुंदडा यांनी जिल्हानिर्मितीची मागणी करताना जमेच्या बाजू ठरतील असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अपर जिल्हाधिकारी आणि अपर पोलिस अधीक्षक कार्यालय अंबाजोगाई शहरात आणले.  खर्‍या अर्थाने अंबाजोगाई शहर पुरोगामी विचारवंतांचे शहर म्हणून ओळखले जाते. याठिकाणची राजकीय मंडळी व नागरिक अत्यंत शांतताप्रिय आहेत. काही वर्षांपूर्वी देशभर उसळलेल्या दंगलीतही अंबाजोगाई शहरात कुठलेही गालबोट लागले नाही. त्याचप्रमाणे पर्यटन विकास महामंडळाकडून अंबाजोगाईस धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनासाठी विशेष दर्जा देण्यात आला आहे. ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व ओळखून इंग्रजांनी औरंगाबाद, बार्शीसह अंबाजोगाई येथे सैनिकी तळ उभा केले होते. चोबारा शिलालेखात अंबाजोगाईची महत्ता लिहिली गेली आहे. त्यात अंबाजोगाईस उपप्रांतिक दर्जा देण्यात आला होता. तसेच याठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठे शासकीय ग्रामीण रूग्णालय आहे. अंबाजोगाई ही शिक्षणाची गंगोत्री आहे, नव्हे तर मराठवाड्याचं पुणे म्हटले जाते. याठिकाणी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध आहे. डी.टी.एड., बी.एड., एम.एड., प्रशिक्षण संस्था याचीही उपलब्धता आहे.  कला आणि सांस्कृतिक  क्षेत्रात अंबाजोगाईचे मोठे योगदान आहे. सामाजिक चळवळ, स्वातंत्र्य लढ्यात, सामाजिक प्रश्‍नांवर नेहमीच उभे राहिले आहेत. राज्यातील जिल्हानिर्मितीचे निकष ठरविण्याबाबत तसेच प्रस्तावित जिल्हे, त्यांचे मुख्यालय, कोणती गावे असावीत याबाबत अभ्यास करण्यासाठी शासनाने सुरुवातीस 24 जून 2014 रोजी महसूल खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. सदर समितीस दोन महिन्यांच्या कालावधीत अहवाल सादर करावयाचा होता. परंतु, दुष्काळी कामांमुळे समितीचे काम पूर्ण न झाल्याने 8 सप्टेंबर 2015 रोजी आदेश काढून या समितीस 31 डिसेंबर 2015 पर्यंत मुदतवाढ दिली. या कालावधीतही समितीने अहवाल सादर न केल्याने समितीस अनुक्रमे 31 मे 2016 आणि 31 जुलै 2016 पर्यंत अशी मुदतवाढ देण्यात आली. यानंतर सदर समितीस कसलीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. तत्कालीन आयुक्त उमाकांत दांगट यांनी लातूर अथवा  नांदेड येथील आयुक्तालय व अंबाजोगाई शहर  जिल्हानिर्मितीसाठी योग्य असल्याचे म्हटले आहे. अंबाजोगाई जिल्हानिर्मितीसाठी फार मोठ्या निधीची आवश्यकता नाही, कारण याठिकाणी अगोदरच जिल्ह्यासाठी लागणारे महत्त्वाचे कार्यालये व सुसज्ज इमारती उभ्या आहेत. आता फक्त जिल्हा घोषीत होणे बाकी आहे.