होमपेज › Solapur › ..अखेर माध्यमिक शिक्षणला खुर्ची मिळाली, कार्यालयही सुरू

..अखेर माध्यमिक शिक्षणला खुर्ची मिळाली, कार्यालयही सुरू

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:38PM

बुकमार्क करा
.सोलापूर : प्रतिनिधी

‘खुर्चीसाठी जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाचे उद्घाटन रखडले’ या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रकाशित करताच अखेर शिक्षण खात्याने नवीन कार्यालयात आपला कारभार उद्घाटनापूर्वीच अनौपचारिक पद्धतीने सुरू केला आहे. शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांच्या हट्टानुसार त्यांच्यासाठी नवीन खुर्चीही तैनात करण्यात आली आहे. 

जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी जि.प. सेसफंडातून 14 लाख रुपयांचा निधी खर्च करून कार्यालय तयार करण्यात आले होते. मात्र या कार्यालयात शिक्षणाधिकारी यांच्याकरिता नवीन खुर्ची नसल्याने या विभागात कामकाज सुरू करण्यास शिक्षणाधिकार्‍यांचा विरोध होत होता. त्यामुळे या कार्यालयाचे उद्घाटन रखडले गेले होते. दै. ‘पुढारी’च्या वृत्तानंतर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व अधिकारी जागे होत शिक्षण विभागाला तातडीने नव्या कार्यालयात हजर होण्याचे आदेश दिले. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार उद्घाटनापूर्वीच सुरू करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी यांच्यासाठीही चांगली नवीन करकरीत व आरामदायी खुर्ची तैनात करण्यात आल्याने या विभागाकडून आता चांगल्या कामाची अपेक्षा वाढली आहे. जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत सोमवारी नूतन  अधिकृत उद्घाटन करण्याची तयारी या विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. तत्पूर्वी या कार्यालयात कर्मचारी आपल्या नवीन जागेत बस्तान बसविताना दिसून येत आहेत. नवीन कार्यालयात कर्मचार्‍यांसाठी टेबल, खुर्च्या व फायलींसाठी कपाट, संगणकप्रणाली आदी सुविधा पुरविण्यात आल्याने या विभागाला कॉर्पोरेट कार्यालयाचा लूक आला आहे.