Thu, Jul 18, 2019 20:59होमपेज › Solapur › जि.प.चे 46 कोटी 65 लाखांचे अंदाजपत्रक मंजूर 

जि.प.चे 46 कोटी 65 लाखांचे अंदाजपत्रक मंजूर 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी 

जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरीता 46 कोटी 65 लाख जमेचे, 46 कोटी 49 लाख 59 हजार खर्चाचे असे 16 लाख 41 हजार रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले. यास सभागृहाने मान्यता दिली. बांधकाम विभागासाठी भरीव तरतूद करुन अन्य विभागांना जेमतेम निधी देण्यात आल्याचे यावेळी दिसून आले. 

जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय सभेप्रसंगी व्यासपीठावर सभापती मल्‍लिकार्जुन पाटील, शीला शिवशरण, रजनी देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेला व्याजाच्या माध्यमातून मिळणारा निधी कमी होत असल्याने जिल्हा परिषद सेस फंडाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेला उत्पन्‍न वाढीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सध्या प्राप्‍त असणार्‍या निधीतून ग्रामीण भागातील लोकांच्या हितासाठी निधी तरतूद करण्याचा प्रयत्न केला असल्याचे यावेळी बजेट 
सादर करताना सभापती डोंगरे यांनी सांगितले. 

या नाविन्यपूर्ण योजना सुरु होणार 

*नाभिक समाजातील होतकरुंना केशकर्तन खुर्ची
*उत्कृष्ट ग्रामपंचायतींना पुरस्कार
*उत्कृष्ट सरपंच व ग्रामसेवकांना बक्षीस योजना
*जिल्हा परिषदेत सौर प्रकल्पासाठी निधी
*सोलर इन्सेक्ट ट्रॅप
*शेतकर्‍यांना स्प्रिंकलर
*कुक्कुटपालनासाठी शेड
*जि.प. सदस्यांसाठी अभ्यास दौरा *कौशल्य प्रशिक्षण
*शेळीगट वाटप योजना
*मागासवर्गीय तरुणांना मोटार चालविण्याचे प्रशिक्षण. 

कृषी विभागासाठी 4 कोटी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून यात सोलार ट्रॅपसाठी 19 लाख, स्प्रिंकलरसाठी 18 लाख, पॉवर टिलरसाठी 45 लाख, पेरणी यंत्रासाठी 15 लाख अशी विशेष नवीन तरतूद करण्यात आली आहे. बांधकाम विभागासाठी 13 कोटी रुपयांची सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. यात रस्ते बांधकामासाठी 7 लाख रुपयांची तरतूद करण्यात  आली आहे. सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी 70 लाख, विश्रामगृह दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

समाजकल्याण विभागासाठी 4 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यात शिलाई मशीनसाठी 30 लाख, पल्वरायझर मशीनसाठी 30 लाख, दलित वस्तीत आरओ मशीनसाठी 1 कोटी, अपंगांना झेरॉक्स मशीनसाठी 55 लाख, अपंगांच्या विवाह प्रोत्साहनासाठी 20 लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. लघुपाटबंधारे विभागासाठी 3 कोटी 50 लाख, पाणीपुरवठा विभागासाठी 2 कोटी 2 लाख, पशुसंवर्धन विभागासाठी 2 कोटी 80 लाख, शिक्षण विभागासाठी 4 कोटी  निधीची तरतूद करण्यात आली आहे. यात शाळांना संगणक पुरविण्यासाठी 50 लाख, फायबर कपाटसाठी 40 लाख, प्रयोगशाळेसाठी 40 लाख अशी तरतूद आहे. याशिवाय शाळेवर सोलर युनिट खरेदी करण्यासाठी 95 लाख व थ्रीडी तारांगण या नवीन उपक्रमासाठी 40 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

Tags : Solapur, Solapur News, Zilla Parishad,  budget, 46 crores, 65 lakhs, approves


  •