Wed, Jul 17, 2019 18:03होमपेज › Solapur ›  जिल्हा परिषदेच्या निधीवर विधानसभेची तयारी!

 जिल्हा परिषदेच्या निधीवर विधानसभेची तयारी!

Published On: May 23 2018 12:10AM | Last Updated: May 22 2018 11:49PM सोलापूर : विजय देशपांडे 

लोकसभा आणि विधानसभा या  दोन्ही निवडणुका  एकत्रित  होण्याचे   संकेत काही दिवसांपूर्वी मिळाले.  तेव्हापासून दुर्लक्षित  असलेल्या करमाळा तालुक्याला देखील निधीचा ओघ सुरू झाला  आहे. गत विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभव झालेले जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संजय  शिंदे यांनी  येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जिल्हा  परिषदेचा जास्तीत  जास्त निधी करमाळा तालुक्याकडे वळविल्याने जिल्हा परिषदेच्या निधीवर विधानसभेची तयारी, अशी चर्चा जि.प. विरोधकांत आता सुरू झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कायम  दुर्लक्षित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या करमाळा तालुक्याला आता ‘अच्छे दिन’ येत असल्याचे  दिसून येत आहे. करमाळा तालुक्यातील निम्म्या भागाची मागास म्हणून ओळख आहे. राजकीय  कुरघोडींमुळे  तालुक्यात दोन साखर कारखाने असूनही ऊस  उत्पादक  शेतकरी वंचितच राहिले आहेत. परंतु आता या तालुक्याला सत्ताधारी आमदार, विधानपरिषदेचे आमदार तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडूनही निधी  मिळत असल्याने मागास करमाळा तालुक्याचा  सर्वांगीण  विकास  होणार, अशी अशा  तालुकावासिय व्यक्‍त करीत आहेत.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी दोन दिवसांपूर्वीच करमाळा तालुक्यातील संगोबा, वाघाचीवाडी, खांबेवाडी, जातेगाव, पुनवर अशा विविध गावांत मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी विरोधकांना तक्रारी करण्यापेक्षा विकासकामांची  स्पर्धा करा, असा  सल्ला दिला. जिल्हा परिषद अध्यक्षांकडून करमाळा  विधानसभा मतदारसंघातच जिल्हा परिषदेचा जास्तीत जास्त निधी दिला जात असल्याची  ओरडही विरोधकांनी सर्वसाधारण  सभेत  केली होती. त्यानंतरही करमाळ्यावरच  जि.प. अध्यक्षांचे जास्त प्रेम असल्याचे सिध्द होत असल्याने  ही तर विधानसभा निवडणुकीची तयारी असल्याचीही चर्चा आता  तालुक्यात रंगू लागली आहे. करमाळा तालुक्यातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आ. नारायण पाटील हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आाहेत.  त्यामुळे त्यांच्याकडूनही तालुक्यातील विकासकामे मोठ्या प्रमाणावर केली जात आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या माजी आ. शामल बागल याही येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून  कामे करीत आहेत.

 माजी आ. शामल बागल या येणारी निवडणूक लढविणार नसल्या तरी आपली  कन्या  रश्मी  बागल-कोलते  यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्या प्रयत्नशील आहेत.   करमाळा तालुक्यातील राजकीय चित्र गत निवडणुकीपासून पुरते बदलले आहे. राजकीय  चित्र  जसजसे बदलत आहे  त्या तुलनेत  करमाळ्याचा  विकासही  झपाट्याने  होताना  दिसत आहे.