Sun, Mar 24, 2019 10:55होमपेज › Solapur › देशात प्रथमच 'युवती काँग्रेस'ची स्थापना सोलापुरात 

देशात प्रथमच 'युवती काँग्रेस'ची स्थापना सोलापुरात 

Published On: Feb 13 2018 6:40PM | Last Updated: Feb 13 2018 6:40PMसोलापूर : प्रतिनिधी

आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रथमच युवती काँग्रेसची स्थापना सोलापुरात करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या विचाराने, धोरणानुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली युवती काँग्रेसचे कार्य चालणार आहे. युवती काँग्रेसच्या माध्यमातून युवतींचे प्रश्‍न व काँग्रेस पक्ष बळकटीसाठी कार्य करणार आहे.

सोलापूर शहर युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रुतिका तुप्पद यांची निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, युवक  काँग्रेस माध्यमातून युवकांचे प्रश्‍न मांडण्याची संधी आहे. पण युवतींनासुद्धा अनेक समस्या भेडसावत असतात. युवती, महिलांचे प्रश्‍न वेगळे आहेत. त्यावर कोणी बोलत नाही. म्हणून आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून युवती काँग्रेस स्थापन करून तरुण युवतींचे प्रश्‍न समाजासमोर आणण्यासाठी, ते सोडविण्यासाठी, शासन दरबारी मांडण्यासाठी युवती काँग्रेसची स्थापना करण्यात आली आहे. युवती काँग्रेसची चळवळ आज या हुतात्मानगरीतून सुरू होत आहे.  राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे.

या युवती काँग्रेसच्या माध्यमातून युवती आणि महिलांचे प्रश्‍न, होणारे अत्याचार, छेडछाड, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम, शैक्षणिक प्रश्‍न, नोकरीविषयक आणि उद्योगविषयी अडचणी, स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण तसेच समाजात युवकांच्या, पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळविण्यासाठी कार्य, त्यांचे अधिकार आणि युवती आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न,  स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण असल्यामुळे युवतींचा राजकारणात आणि समाजकारणात सहभाग वाढविण्यासाठी, त्यांचे नवे नेतृत्व या माध्यमातून उभे करण्यासाठी या युवती काँग्रेसच्या माध्यमातून कार्य करणार आहोत.

युवतींना आपले प्रश्‍न मांडण्यासाठी एक फ्लॅटफॉर्म युवती काँग्रेसमार्फत उपलब्ध होईल. भारतीय नारीबाबत असे म्हणतात ‘फुल नही चिंगारी है, यह भारत की नारी है’ आणि युवतीचे प्रश्‍न मांडण्यासाठी या चिंगारीची सुरुवात आज या सोलापुरातून, हुतात्मानगरीतून झाली आहे. असेच कार्य राज्यात आणि देशभरात युवती काँग्रेसचे कार्य ज्येष्ठ नेतेमंडळी, महिला पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या विचाराने, धोरणाने करण्याचे प्रयत्न राहील, असे आ.  शिंदे म्हणाल्या.

यावेळी महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, नगरसेविका वैष्णवी करगुळे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, प्रियांका डोंगरे, गटनेते चेतन नरोटे, सोलापूर शहर युवक अध्यक्ष अंबादास  करगुळे, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, बसवराज तुप्पद, विकी दुधनीकर, एनएसयुआयचे  अध्यक्ष गणेश डोंगरे, विश्‍वनाथ साबळे, उत्तर युवक अध्यक्ष विवेक कन्ना, शहर दक्षिण अध्यक्ष सैफन शेख,  तिरुपती परकीपंडला, गीता पाटील, उज्ज्वला गवळी, गीता सपळे, वृंदा माने, वैशाली जाधव, वर्षा कुर्ले, छाया शिंदे, दीपाली राऊत, लक्ष्मी गिरे, आरती हुळले आदी प्रमुख उपस्थित होते.