Tue, Jun 18, 2019 20:25होमपेज › Solapur › विवाहितेवर बलात्कार; तरुणास 10 वर्षांची शिक्षा

विवाहितेवर बलात्कार; तरुणास 10 वर्षांची शिक्षा

Published On: Jan 25 2018 1:00AM | Last Updated: Jan 24 2018 10:52PMसोलापूर : प्रतिनिधी

गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार करणार्‍या होटगीच्या  तरुणास 10 वर्षे कारावास व 1 लाख  रुपये  दंडाची  शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. आर. व्ही. सावंत- वाघुले यांनी सुनावली.

राजू बलभीम जाधव (वय 26, रा. होटगी सेटलमेंट, ता. द. सोलापूर) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

8 मे 2012 रोजी यातील पीडित विवाहिता रात्री आठच्या सुमारास घराजवळील  महिलांच्या    सार्वजनिक शौचालयाकडून घराकडे परत येत होती. त्यावेळी राजू जाधव हा पाठीमागून आला व त्याने तिच्या गळ्यास चाकू लावून ठार मारण्याची धमकी देऊन तिला ओढत शौचालयात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून वळसंग पोलिसांनी आरोपी राजू जाधव यास अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. आर. व्ही. सावंत-वाघुले यांच्यासमोर झाली. सरकारच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील एक साक्षीदार फितूर झाला.  न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद व इतर साक्षी ग्राह्य धरून बलात्कारप्रकरणी आरोपी जाधव यास दोषी धरून 10 वर्षे कारावास आणि 1 लाख 7 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी 1 लाख रुपये हे पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

याप्रकरणी सरकारच्यावतीने अ‍ॅड. प्र्रदीपसिंग रजपूत यांनी, तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड. शेख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस शिपाई शीतल साळवे यांनी काम पाहिले.