होमपेज › Solapur › गोदुताई गृहप्रकल्पाचा जागतिक स्तरावर सन्मान 

गोदुताई गृहप्रकल्पाचा जागतिक स्तरावर सन्मान 

Published On: Jun 14 2018 10:37PM | Last Updated: Jun 14 2018 9:36PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

कष्टकरी  विडी कामगारांसाठी कुंभारीच्या माळरानावर सिटूच्या माध्यमातून साकारलेल्या कॉ. गोदुताई परुळेकर तसेच कॉ. मीनाक्षी साने या गृहप्रकल्पांना जागतिक स्तरावर प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्ताने सोलापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे.

सोलापुरात विडी उद्योग मोठ्या प्रमाणात असून यामध्ये सुमारे 70 हजार महिला विडी कामगार आहेत. या कामगारांना त्यांच्या हक्काचे घर असावे म्हणून कामगार नेते व माजी आ. नरसय्या आडम यांनी सुमारे 12 वर्षांपूर्वी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या (सिटू) माध्यमातून कॉ. गोदावरी (गोदुताई) परुळेकर नामक गृहप्रकल्प साकारला. 
केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून हा प्रकल्प राबविण्यात आला होता. आशिया खंडातील पहिला एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प म्हणून या प्रकल्पाचा लौकिक झाला होता. जिनिव्हा येथील परिषदेत  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या प्रकल्पाचा उल्लेख केला होता.  यामुळे सोलापूरचा एकप्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव झाला होता. या प्रकल्पानंतर  सिटूने पुन:श्‍च विडी कामगारांसाठीच कॉ. मीनाक्षी साने नामक पाच हजार 100 घरांची योजना पूर्ण केली. 

या दोन्ही प्रकल्पांना अ‍ॅमस्टरडॅम येथील ट्रान्स नॅशनल इन्स्टिट्यूटने जागतिक पुरस्काराची घोषणा केली आहे. ‘ट्रान्सफर्मेटिव्ह सिटीज् 2018’ असे या पुरस्काराचे नाव असून शुक्रवार, 8 जून रोजी या पुरस्काराची घोषणा ट्रान्स नॅशनल इन्स्टिट्यूटकडून करण्यात आली.  न्यूज क्लिक या संस्थेने गोदूताई-मीनाक्षी प्रकल्पांचा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविला होता. याकरिता दोन महिन्यांपूर्वी न्यूज क्लिकचे प्रतिनिधी सोलापुरात येऊन गेले होते. 

कोलव्हिया, नायझेरिया, फ्रान्स, अमेरिका, मॉरिशस, टांझानिया, स्पेन व भारत अशा एकूण 8 देशांमधून प्रस्ताव आले होते. ऊर्जा, पाणी, घर अशा तीन वर्गांसाठी पुरस्कारांचे नियोजन होते. यापैकी घर या वर्गाकरिता गोदूताई-मीनाक्षी प्रकल्पाची प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. एकूण  32 प्रस्ताव पुरस्कारासाठी आले होते. यापैकी 9  प्रकल्प पुरस्कारासाठी निवडण्यात आले. 

या पुरस्कारानिमित्ताने सोलापूरचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे. पुरस्कार वितरणाचा तपशील लवकरच जाहीर होणार आहे.