Thu, Apr 25, 2019 03:29होमपेज › Solapur › जागतिक बालकामगार विरोधी दिन : साडेसहा हजार बालकामगार आले शिक्षणाच्या प्रवाहात  

जागतिक बालकामगार विरोधी दिन : साडेसहा हजार बालकामगार आले शिक्षणाच्या प्रवाहात  

Published On: Jun 12 2018 12:54AM | Last Updated: Jun 11 2018 11:53PMसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे 

श्रम व रोजगार मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे   गेल्या पाच वर्षांत साडेसहा हजार बाल कामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले आहे. 

ज्या वयात हातामध्ये वही-पेन हवी त्या वयात कोमल हाताने वीटभट्टी, विड्यांचे कारखाने, जरीकामाच्या फॅक्टरीत, दुकान-हॉटेलांतून मजुरी करीत राबताना दिसत असतात. त्या बालकांना शिक्षण मिळाले तरच ते पुढे चांगला नागरिक होणार आहेत. उद्याचे भविष्य त्यांच्या हातात आहे. ते शिकले तरच ते येणार्‍या पुढच्या पिढीलाही शिक्षण देतील. आता शिक्षणाचा प्रसार होत असल्याने पालकांनाही शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे. अज्ञान आणि गरिबी यामुळेच बालकामगारांमध्ये वाढ होते. शिक्षणामुळे अज्ञान आणि गरिबी दूर होत असल्याने बालकामगारांचा टक्‍काही दूर होत आहे. यासाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे कामही विचारात घ्यावे लागणार आहे.

दरवर्षी एप्रिल ते जून यादरम्यान बालकामगारांचे सर्वेक्षण केले जाते. मागीलवर्षी 2017-18 सालामध्ये 1 हजार 386 बालकामगार आढळून आले होते. यंदाच्या चालू वर्षी सर्वेक्षण असून 600 बालकामगार आढळून आले आहेत. स्वयंसेवी संस्थामार्फत उर्वरित सर्वेक्षण चालू आहे. बालकामगारांच्या विषयावर जनजागृती करण्यासाठी गट निर्माण केले आहेत. बालकामगार विशेष प्रशिक्षण म्हणून 60 केंद्रे आहेत. त्यात बीएड् झालेले 120, तर एमएसडब्ल्यू झालेले 60, तर 60 सेविका काम करतात. 20 जणांचा स्टाफ मुलांना व्यवसाय प्रशिक्षण देत असतो. पालकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. यात 2 हजार 922 पालक लाभार्थी असून त्यातील 2512 पालकांना लाभ मिळवून देण्यात आला असल्याचे सोलापूर विभागाच्या प्रकल्प संचालिका प्रा. अपर्णा बनसोडे यांनी दै. ‘पुढारी’ शी बोलताना सांगितले. 

2015 पासून किशोरी विकास प्रकल्पातून प्रतीवर्षी साडेसातशे मुलींचे (14 ते 18 वयोगटातील) विवाहपूर्व डॉक्टरांकडून समुपदेशन केले आहे. त्यामुळे कमी वयात व्हावयाच्या विवाहात घट झाली आहे. करियर गाईडन्समार्फत बँक अधिकारी, नवउद्योजकांना बोलावून मार्गदर्शन केले जात असल्याचेही प्रा. अपर्णा बनसोडे यांनी सांगितले.  

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे उपक्रम  

उपक्रम आणि कंसात आकडेवारी - बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्र (30), वयानुरुप शैक्षणिक गुणवत्ता विकास प्रशिक्षण (1830), जीवन कौशल्य प्रशिक्षण , व्यवसायपूर्व प्रशिक्षण, किशोरवयीन (14 ते 18 वयोगट) बालकामगार  वर्ग (700 विद्यार्थी), पालकांना शासकीय योजनांचा लाभ (605 पूर्ण लाभार्थी, 1073 पाठपुरावा), प्रौढ साक्षरता वर्ग (912 लाभार्थी), किशोर विकास गट (1015), युवा विकास गट (105 लाभार्थी), ज्येष्ठ नागरिक गट (821), थेट हस्तांतरण प्रणालीअंतर्गत बालकामगारांना विद्यावेतनाचा लाभ, विद्यार्थी व पालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्वांकष आरोग्य तपासणी, बालक-पालक मेळावा, शैक्षणिक  व व्यवसायपूर्व साहित्य प्रदर्शन, कलाविष्कार स्नेहसंमेलन, जनजागृतीपर विविध औचित्य साधून कार्यक्रम.

पाच वर्षांतील आकडेवारी  

पाच वर्षांत बालकामगारांना शोधून शिक्षण प्रवाहात आणलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे, कंसात साल -   1 हजार 87  (2011-12), 897 (2012-13), 1 हजार 295 (2013-14), 213 (2014-15), 1 हजार 57 (2015-16), 801 (2016-17), 1 हजार 286 (2017-18) सर्वांची बेरीज पाच वर्षांत 6 हजार 636 बालकामगारांना शिक्षण प्रवाहात आणले. 2014-15 आणि 2016-17 मध्ये केंद्रांची संख्या कमी असल्याने आकडेवारी खाली होती. मात्र त्यात आता वाढ झाल्याने गतवर्षीत मोठ्या प्रमणात वाढ झाली असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.