Thu, Jul 18, 2019 04:43होमपेज › Solapur › कार्यकर्त्यांचे आंदोलन काँग्रेससाठी धोक्याचे !

कार्यकर्त्यांचे आंदोलन काँग्रेससाठी धोक्याचे !

Published On: Jul 24 2018 11:28PM | Last Updated: Jul 24 2018 11:16PMलोकशासन : प्रशांत माने

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमधून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पक्षाने वगळल्यामुळे नुकतेच सोलापूर शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनमध्ये कुंड्या फोडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निषेधार्थ केलेले आंदोलन हे भविष्यात काँग्रेससाठी धोक्याची घंटाच आहे. कारण सुशीलकुमारांना वगळून सोलापूर शहर व जिल्ह्याचे शंभर टक्के, तर महाराष्ट्राचे बहुतांशी राजकारण सुरळीत करणे काँग्रेसला तितकेसे सोपे नसणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी दुसरा कोणताही मागासवर्गीय चेहरा सध्या तरी काँग्रेससमोर नसल्याने शिंदेंना वगळून आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी अग्‍निपरीक्षाच असणार आहे. कारण मागासवर्गीय समाजाची नाराजी काँग्रेसवर ओढावण्याची शक्यता आहे.

राजकारणात सोलापूरचे नाव निघाले की सुशीलकुमार शिंदे यांचे नाव  समोर येणे अपेक्षितच. कारण सोलापूर शहर व जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे यांचा दबदबा मोठा आहे. सोलापूर लोकसभा राखीव आणि जनरल अशा दोन्ही जागांवर सोलापूरकरांनी सुशीलकुमारांना निवडून दिलेले आहे. देश व राज्यातील अनेक शासकीय व राजकीय मोठ्या पदांवर कार्य केलेल्या शिंदे यांना गत लोकसभा निवडणुकीतील एका पराभवामुळे पक्ष संघटनेतून अचानक दूर करणे हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तर सोडाच पण सोलापूरकरांनाही रुचणारे नाही. काँग्रेस शहर कार्यकार्यकर्त्यांनी केलेले निषेधाचे आंदोलन हे त्याचेच द्योतक आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षांतर्गत संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. परंतु देशातील काँग्रेसची स्थिती पाहता पक्षश्रेष्ठींनी नव्या-जुन्यांचा संगम करुन पक्ष संघटन पुन्हा एकदा मजबूत होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते.

अद्यापही पक्षामध्ये ज्येष्ठांची संख्या व त्यांचा दबदबा मोठाच आहे. पक्ष संघटनेमधून ज्येष्ठांना बाजूला ठेवण्याचा निर्णय काँग्रेसला परवडणारा नाही. कारण भारत देशाचा राजकीय इतिहास पाहिला तर एकदा का राजकारणात  माणूस आला की तो अखेरच्या श्‍वासापर्यंत दुसरे काहीच करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण जीवन राजकीय व सामाजिक कार्यामध्ये घालवल्यानंतर  शेवटच्या टप्प्यात  आणि तेदेखील प्राकृतिकदृष्ट्या तंदुरुस्त असताना राजकारणापासून दूर राहणे त्यांना तितकेसे शक्य होत नाही.  मग  त्यांना पक्षापासून दूर लोटल्यास ते आणि त्यांचे अनुयायी उपद्रवमूल्य दाखवतातच. म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षीय घटनेमध्ये निवृत्ती वय निश्‍चित करुन धोरणात्मक निर्णय घेतल्यास राजकारणात येणार्‍या व्यक्‍तीसाठी हे सोयीचे जाणार आहे. कारण त्याला हे निश्‍चित माहिती असणार आहे की, आपला राजकीय प्रवास नेमका कुठपर्यंत आहे.