Wed, Jun 26, 2019 11:28होमपेज › Solapur › कर्मचारी संपामुळे कामकाज ठप्प

कर्मचारी संपामुळे कामकाज ठप्प

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 11:06PMसोलापूर : प्रतिनिधी

सातवा वेतन आयोग, अनुकंपा भरती, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचार्‍यांच्या सर्वच संघटनांनी संपूर्ण राज्यभर 7 ते 9 ऑगस्ट असा तीन दिवस संप पुकारला असून या संपात सोलापूर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय 19 हजार 450 कर्मचारी  सहभागी झाल्याने संपाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी शासकीय कामकाज ठप्प होते.

राज्यातील सर्व शासकीय कर्मचार्‍यांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन उदासीनता दाखवत आहे. कोणत्याही मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. राज्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे.  सातवा वेतन आयोग जानेवारीपासून आणि 14 महिन्यांचा महागाई भत्ता ऑगस्ट महिन्याच्या पगारात रोखीने देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर देखील सरकारच्या विरोधात जात कामगार संघटनांनी मंगळवार, 7 ऑगस्टपासून तीन दिवसीय संप सुरू केला आहे.

शासकीय कर्मचारी संघटनांनी अत्यावश्यक सेवादेखील संपातून वगळली नाही, परंतु नर्सेस संघटनेमध्ये फूट पडल्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा सुरळीत मिळाली आहे. 

मिनीमंत्रालयाचे 15 हजार कारभारी संपावर
मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतील सुमारे 15 हजार कर्मचारी व शिक्षकांनी संप सुरू केला आहे. या संपात प्राथमिक शाळेतील सुमारे दहा हजार शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, लेखा विभागातील कर्मचारी आदी संघटनांच्या सुमारे पाच हजार असे एकूण 15 हजार कर्मचार्‍यांनी संपात सहभाग घेतला आहे. या संपामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीत दिवसभर शुकशुकाट होता. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत आदी ठिकाणी कर्मचारीच नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. कर्मचारीच संपावर असल्याने अनेकांना माघारी फिरण्याची वेळ आली. 

लिपिकवर्गीय संघटना, मागासवर्गीय संघटना  या दोन संघटनेच्या काही पदाधिकार्‍यांनी या संपात सहभाग घेतला नसल्याचेही दिसून आले.

बांधकाम विभागात कडकडीत संप
सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता व इतर सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे येथे येणार्‍या ठेकेदारांना व संबंधित व्यक्तींना कामे न करताच परत जावे लागले. सोलापूर विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणारी 125 महाविद्यालये सुरळीत सुरू होती. या संपामध्ये जिल्हा क्रीडा विभागातही सर्व अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी न होता कार्यालयात हजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे या विभागाशी संबंधित सर्व कामकाज सुरळीत सुरू होते.

आरोग्यसेवेवर फारसा परिणाम नाही
या संपाला मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात संमिश्र प्रतिसाद मिळाला. रुग्णालयातील 20 टक्के नर्सेस संपात सहभागी झाल्या होत्या. डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील 90 टक्के तृतीय व चतुर्थ कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने महाविद्यालयातील कामावर परिणाम जाणवला. शासकीय रुग्णालयातील आरोग्यसेवा मात्र सुरळीत सुरू होती. जिल्हा परिषद आरोग्य सेवक कर्मचारी संघटनेची सोलापूर जिल्हा शाखा या संपात सहभागी झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणची प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांत रुग्णसेवा सुरळीत सुरू होती. 

कर्मचार्‍यांची निदर्शने आणि धरणे आंदोलन
शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. या पार्श्‍वभूमीवर संपाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण शासकीय कामकाज ठप्प करून कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करीत धरणे आंदोलन केले. यावेळी कॉ. नरसय्या आडम यांच्यासह विविध संघटनांचे कामगार नेते उपस्थित होते. महापालिका कर्मचारी संघटनेने संपात सहभागी न होता संपास पाठिंबा दिला असल्याने महापालिकेचे कामकाजदेखील सुरळीत होते.