Tue, Apr 23, 2019 06:37होमपेज › Solapur › ठेका मंजूर होऊनही कामास सुरुवात होईना

ठेका मंजूर होऊनही कामास सुरुवात होईना

Published On: Mar 09 2018 10:36PM | Last Updated: Mar 09 2018 8:44PMबार्शी : गणेश गोडसे

पुणे येथील एका खासगी कंपनीने टेंभुर्णी ते येडशीदरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरण कामाचा ठेका घेतला आहे. ठेका मंजूर होऊनही कामास विलंब होत असल्याने या रस्त्याचे काम होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा रंगत आहे. 

दळणवळणाच्याद‍ृष्टीने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व प्रशासनाने टेंभुर्णी ते येडशी या 93 कि.मी. अंतराच्या राज्यमार्गाचे केंद्र शासन, राज्य शासन व संबंधित ठेकेदार यांच्या संयुक्‍त माध्यमातून ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या धोरणावर चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी तत्कालीन व तद्नंतरच्या शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वारंवार निविदाही प्रसिध्द केल्या होत्या. मात्र अनेकदा निविदा प्रसिद्ध होऊनही ठेकेदारांकडून या मार्गाच्या कामासाठी म्हणावा असा प्रतिसाद मिळत नव्हता.

ठेका मंजूर, कामास मात्र विलंबचौपदरीकरणाच्या अफाट खर्चामुळे ठेकेदारांमधून उदासिनता होती. मात्र पुणे येथील एका खासगी कंपनीने टेंभुर्णी ते येडशीदरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरण कामाचा ठेका घेतल्याने रुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. ऑक्टोबर 2013 मध्येच रस्ते रुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्याचा मुहूर्तही काढण्यात आला होता.संबंधित कंपनीकडून टेंभुर्णी, बार्शी, पांगरी ते येडशीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मूळ मालकीच्या जागेच्या स्थाननिश्‍चितीचे काम सुरू करून ते पूर्णही करण्यात आलेले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच जागेवर अनेकांनी आपली बांधकामे थाटल्याचे सध्याच्या सर्वेक्षणातून दिसत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेची हद्द अनेकांच्या मोठमोठ्या बांधकामाच्याही पाठीमागे गेल्या असल्याचे निदर्शनास येते.जागानिश्‍चितीनंतर चित्र होणार स्पष्टरूंदीकरणासाठी प्रत्यक्षात शासन किती जागा ताब्यात घेणार, हे मात्र प्रत्यक्ष कामास  सुरूवात झाल्यानंतरच समजणार आहे. तेवढ्यात हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने चौपदरीकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.

टेंभुर्णी ते लातूरदरम्यानचा कर्डुवाडी ते बार्शी तालुक्यातील कुसळंबदरम्यानचा चौपदरीकरणातील रस्ता  सातारा-लातूर व पंढरपूर-खामगाव या दोन रस्त्यांसाठी एकच दुवा आहे. त्यामुळे हे मार्ग पूर्ण होण्यासाठी टेंभुर्णी ते लातूर या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम मार्गी लागणे गरजेचेच आहे. केंद्रीय मंत्र्यांची घोषणा हवेत विरलीअनेक वर्षांचा कालावधी उलटून जाऊनही टेंभुर्णी-लातूर या रस्त्याचे भोग मात्र काही केल्या संपण्यास तयार नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणेमुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. मंत्र्यांच्या घोषणेनुसार काम सुरू झाल्यास या मार्गाची अनेक वर्षांपासून सुरू असलेली अवहेलना संपण्यास हातभार लागणार आहे. 

टेंभुर्णी ते येडशीदरम्यानच्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी व एका लेअरसाठी 29 कोटी रूपयांच्या  आसपास निधी मंजूर झाल्याची व काम लवकरच सुरू होणार  असल्याची चर्चा आहे. चौपदरीकरणाचे काम जाहीर करण्यात  आल्याप्रमाणे जर एका महिन्यात सुरू झाले तर शासनाचे 29 कोटी रूपये वाचण्यासही मदत होणार आहे.  त्यामुळे संबंधित विभागाने याबाबत  त्वरित  उचित कार्यवाही करणे गरजेचे आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख यांची टेंभुर्णी-लातूर रस्ता  चौपदरीकरणाची इच्छापूर्ती कधी होणार याकडे सोलापूर, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.