Fri, May 24, 2019 20:58होमपेज › Solapur › घंटागाड्या चालकांकडून महिलांची कुचंबणा; नगरसेवक काळेंचा आरोप

घंटागाड्या चालकांकडून महिलांची कुचंबणा; नगरसेवक काळेंचा आरोप

Published On: Sep 08 2018 1:34AM | Last Updated: Sep 07 2018 10:21PMसोलापूर : प्रतिनिधी 

घंटागाड्या घरासमोर थांबण्यासाठी घंटागाड्यांचे चालक व हेल्पर चहा-पाण्यासाठी पैसे मागतात, दिले नाही तर ते न थांबता पुढे जातात, कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलांना ते स्वतःच गाडीत कचरा टाकण्यासाठी सांगतात व त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहताना लज्जास्पद वागणूक देतात, असा सनसनाटी आरोप नगरसेवक राजेश काळे यांनी केला आहे.

जुळे सोलापूर येथील प्रभाग क्रमांक 24  मध्ये हा प्रकार सर्रास घडत असून त्याची तक्रार येथील भाजप नगरसेवक काळे यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे स्पेन येथे दौर्‍यावर असलेल्या महापालिका आयुक्तांना केली आहे. काळे म्हणाले की, जुळे सोलापूर परिसरातील सिंधूविहार, श्रीकांतनगर, जानकीनगर आदी परिसरात सकाळी सात वाजल्यापासून घंटागाडी फिरायला सुरुवात होते. या घंटागाडीवर ‘स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर’बाबतच्या तयार केलेली गाणी लावणे बंधनकारक असताना येथील घंटागाडीचालकांकडून बिभत्सगाणी लावली जातात. घंटागाडी दारासमोर थांबत नसल्याने अनेक महिलांना कचरा घेऊन गाडीपर्यंत धावपळ करत यावे लागते. सकाळी सातच्या सुमारास महिला या घरगुती कपडे परिधान केलेल्या असतात. तशाच अवस्थेत त्या केवळ कचरा टाकण्यासाठी गाडीजवळ आल्यावर त्यांच्याकडे चालक व हेल्परकडून वाईट नजरेने पाहिले जाते, शिवाय हेल्परकडून गाडीत कचरा टाकला जात नसून महिलांना तितक्या उंच घंटागाडीत कचरा टाकण्यास सांगितले जाते. ही अवमानास्पद आणि लज्जास्पद वागणूक दिली जाण्याचे प्रकार राजरोस केले जात आहेत. महिला महापौर असल्याने त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेण्याची मागणी समस्त महिलावर्गातून होत आहे.