होमपेज › Solapur › महिला, मुलींना मिळणार घरपोच सॅनेटरी पॅड!

महिला, मुलींना मिळणार घरपोच सॅनेटरी पॅड!

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 9:57PMसोलापूर: महेश पांढरे 

देशातील आणि ग्रामीण भागातील अशिक्षित आणि आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या महिला आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी जागृती व्हावी, तसेच अनेक आजारांपासून त्यांची सुटका व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अस्मिता योजनेतून अल्पदरात सॅनेटरी पॅड पुरविण्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात ही योजना कार्यान्वित झाली आहे.

या योजनेतून गरीब आणि अशिक्षित महिलांना सॅनेटरी पॅड वापराविषयी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात सॅनेटरी पॅड वापरण्याचे प्रमाण केवळ 17 टक्के असल्याचे शासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या काळात महिला आणि युवतींना आवश्यक असणारे पॅड कमी किमतीत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांतील मुलींनाही याचा लाभ होणार आहे. तसेच मेडिकल दुकानात हे पॅड खरेदी करण्यासाठी जाणार्‍या महिलांची कुचंबना होत असल्याने त्यांना आता घरपोच केवळ 25 ते 30 रुपयांत हे पॅड पुरविण्यात येणार आहेत.

मेडिकल दुकानात अनेक वेळा पुरुषांची मोठी गर्दी असल्याने पॅड 

खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिला आणि मुलींची मोठी कुचंबना होत होती. ती टाळण्यासाठी शासनाने अस्मिता योजना सुरु केली असून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांना नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून बचत गटातील महिलांमार्फत या पॅडची विक्री करण्यात येणार आहे.