Thu, Jun 27, 2019 16:17होमपेज › Solapur › भाजप सरकारच्या काळात महिला असुरक्षित : चित्रा वाघ 

‘भाजप सरकारच्या काळात महिला असुरक्षित’

Published On: Mar 16 2018 6:58PM | Last Updated: Mar 16 2018 7:13PMसोलापूर : प्रतिनिधी 

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाजप सरकारच्या काळात आता महिला व मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत. इतकेच नाहीतर महिलांना सुरक्षा देण्यात सरकार हतबल ठरले आहे. त्यामुळे असुरक्षिततेच्या वातावरणामुळे भयभीत झालेल्या व अत्याचारपीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावरची लढाई लढणार असून, यासाठी प्रत्येक महिलेने पेटून उठणे गरजेचे आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले. 

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्यावतीने शुक्रवारी दुपारी शांतीसागर मंगल कार्यालयात सोलापूर शहर व जिल्हा महिला मेळावा आणि नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तपत्र प्रदान करण्याचा सोहळा माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक बावीकर आदींच्या हस्ते पार पडला. या मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी प्रदेशाध्यक्ष वाघ बोलत होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘आज दररोज आया-बहिणींची अब्रू वेशीवर टांगली जात आहे. स्त्री असो किंवा पुरुष यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारचीच असताना सरकार ती जबाबदारी झटकत आहे. ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे अशा अनेक महिलांची तक्रार पोलिस घेत नाहीत. अशी परिस्थिती असताना फडणवीस सरकार काय करीत आहे. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महिलांना आज घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. स्त्रीभ्रूण हत्या वाढत आहेत. त्याचा प्रतिकार होणे गरजेचे आहे. त्यामुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात महिलांनी पेटून उठले पाहिजे.’’    

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ कोटी गॅस कनेक्शन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन त्यांनी पाळले नाही. अनेकांना सिलेंडरच्या टाक्याच मिळाल्या नाहीत. एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. एकूणच भाजपच्या उज्वला गॅस योजनेचा फज्जा उडाला आहे. रेशनवरील सर्वच प्रकारचा माल बंद केल्यामुळे गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. वॉटर, मीटर आणि गटाराचे प्रश्न तसेच आहेत. छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला आता खुर्चीवरून ढकलण्याची वेळ आली’’ असल्याचेही वाघ यावेळी म्‍हणाल्‍या. 

‘‘शरद पवार यांनी महिलांची शक्ती ओळखून त्यांना ५० टक्के आरक्षण दिले. महिलांचा भौतिक नव्हे तर सामाजिक विकास करण्याचे काम त्यांनी केल्याचे सांगत सोलापूर शहरात शहराध्यक्षा सुनीता रोटे यांनी राष्ट्रवादी पार्टीशिवाय दुसरा पर्याय नाही, असे वातावरण तयार केले असल्याचे निरीक्षक प्रदीप गारटकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. शहराध्यक्ष भारत जाधव यांनी आजच्या मेळाव्यामुळे शहरात महिलांची ताकद वाढण्यास मदत होईल असे सांगितले. माजी महापौर मनोहर सपाटे यांनी सुनीता रोटे यांच्या कार्याचे कौतुक करताना शरद पवारांच्या विचारांची पाळेमुळे शहरात खोलवर रुजविण्याचे काम होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महिलांसाठी जी काही धोरणे आखली त्यामुळे आज महिला सक्षम होत आहेत. महिला धोरण राबवून ते अमलात आणणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण मिळण्यासाठी पवारांचे योगदान कोणतीही महिला विसरू शकणार नसल्याचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. महिलांची वाढती ताकद राष्टवादी पक्षाला बळ देणारी असून, सुनीता रोटे यांनी आपल्या कामाची पावती दिली आहे. जनतेच्या प्रश्नासाठी रोटे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून अनेकदा सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षच महिलांचे संघटन करू शकतो हे मेळाव्यातून सिद्ध झाल्याचे महिला आघाडीच्या निरीक्षक निर्मला बावीकर यांनी सांगितले. 

सोलापूर शहरात राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी जीवाचे रान करू, असे सांगतानाच श्रेष्ठींचा आदेश येताच भाजप सरकारच्या विरोधात आंदोलनासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आपण मागे हटणार नसल्याचे शहराध्यक्ष नगरसेविका सुनीता रोटे यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांचीच साथ असल्यामुळेच राष्ट्रवादी पक्ष शहरात वाढू लागल्याचे नगरसेविका रोटे म्हणाल्या. जिल्हाध्यक्ष मंदाताई काळे म्हणाल्या, मिळालेल्या पदाला न्याय दिला पाहिजे. पद घेऊन घरात बसू नये. पदाचा मान राखण्यासाठी शंभर टक्के पक्षवाढीसाठी महिलांनी झोकून काम केले पाहिजे. 

पायात पाय नको ; एकमेकींच्या हातात हात,  आवडत्या नावडतींना सोबत घेऊन काम करण्याचीच आज गरज आहे. पायात पाय घालण्यापेक्षा एकमेकींच्या हातात हात घालून शरद पवार यांना अभिप्रेत असलेली राष्ट्रवादी महिला काँग्रेस तयार झाली पाहिजे. एकमेकींची निंदा नालस्ती करू नका, एकमेकींचा सन्मान करा आदर राखा आणि मैत्रिणी बनून छान काम करा. असा सल्ला देत प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एकमेकींना पाण्यात पाहणाऱ्या राष्ट्रवादी महिलांचे कान टोचले. 

Tags : Women, BJP government, NCP leader, chitra wagh, solapur