Mon, Aug 26, 2019 00:19होमपेज › Solapur › बार्शी तालुक्यातील २८ गावांत चालणार महिलांची ‘पाटील’की

बार्शी तालुक्यातील २८ गावांत चालणार महिलांची ‘पाटील’की

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 8:59PMबार्शी : गणेश गोडसे 

भारतात लोकशाहीमुळे स्त्री-पुरूष यांच्याबरोबरच सर्वच समाजघटकांना न्याय मिळत आहे. तालुक्यात पार पडलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत चक्‍क 28 गावांमधील ‘पाटील’की महिलांच्या हातात गेली आहे.

बार्शी तालुक्यातील 138 गावांपैकी 104 गावांतील पोलिस पाटलांच्या जागा भरण्यात आलेल्या आहेत. 104 पोलिस पाटील भरती प्रक्रियेत 76 ठिकाणी पुरूष, तर 28 गावात महिला कामकाज सांभाळणार आहेत. बार्शी तालुक्यातील 28 गावांतील जागा अजूनही रिक्त आहेत. बार्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 13, पांगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 8, तर वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीत 11 ठिकाणी पोलिस पाटलांच्या जागा रिक्त आहेत.

बार्शी तालुक्यातील अनेक वर्षांपासून रिक्‍त असलेल्या पोलिस पाटलांच्या जागा भरण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय यांच्यामार्फत राबवण्यात आली. वेगवेगळ्या गावांतील आरक्षण सोडत पद्धतीने काढून प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली.  लेखी परीक्षा, मुलाखती अशी सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्या उमेदवारांमधील क्षमता बघून त्यांची पोलिस पाटीलपदी नियुक्ती करण्यात आली. 

अनेक गावांत पोलिस पाटील हे पद वर्षानुवर्षे रिक्तच होते. ही पदे भरण्यासाठी वारंवार मागणी केली जात होती. प्रशासकीय पातळीवर हिरवा कंदील मिळत असे. मात्र काहीतरी अडचणी उद्भवून प्रक्रिया रखडत होती. या पार पडलेल्या भरती प्रक्रियेत गावातील शासकीय ‘पाटील’की समाजातील वेगवेगळ्या  प्रवर्गातील महिलांच्या हातात आली आहे. ग्रामीण भागातील व वाड्यावस्त्यांवरील पोलिस पाटील हे पद खूपच महत्त्वाचे पद मानले जाते. पोलिस पाटील हा प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक  असल्यामुळे त्याला समाजात मानाचे स्थान आहे. स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटलांकडे बघितले जाते व तशी प्रशासकीय जबाबदारीही त्यांच्यावर देण्यात आलेली असते. 

अल्प मानधनात सेवा 

पोलिस पाटील हे गत अनेक वर्षांपासून अगदी तुटपुंज्या मानधनावर  आपले कामकाज चालवतात. आजच्या महागाईच्या काळात जेमतेम मानधनावरच  पोलिस पाटील  कामाकाज पाहतात.त्यांना त्यांच्या प्रामाणिक सेवेचा म्हणावा असा मोबदला मिळत नसल्याची खंत पोलिस पाटलांच्या कुटुंबातील सदस्यांमधून व्यक्त केली जात आहे. सध्या नावात पाटील असलेले हे पोलिस पाटील जेमतेम 3 हजार रूपये मानधनावरच आपले कामकाज इमाने इतबारे करताना दिसून येत आहेत. मानधनामध्ये वाढ करावी, सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 65 वर्षांची करून सेवानिवृत्ती वेतन लागू करावे, अशी या संघटनेची मागणी असून या मागणीसाठीच नुकतेच नागपूर येथील अधिवेशनात संघटनेने मोर्चा काढला होता. गावपातळीवर अतिशय जबाबदारीने आपले काम पार पाडणार्‍या पोलिस पाटलांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सवलती द्याव्यात, अशी मागणी होत आहे.