होमपेज › Solapur › रुक्मिणीमातेस वाण; आनंदल्या सुवासिनी

रुक्मिणीमातेस वाण; आनंदल्या सुवासिनी

Published On: Jan 15 2018 1:45AM | Last Updated: Jan 14 2018 9:59PM

बुकमार्क करा
पंढरपूर :  प्रतिनिधी

तिळगूळ घ्या गोड गोड बोला, मकर संक्रांतीनिमित्त स्नेहपूर्ण भावाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भक्‍तिभावमय वातावरण निर्माण झाले होते. मकसंक्रांतीनिमित्त पंढरीत रविवारी राज्यभरातून आलेल्या  महिलांची पहाटेपासूनच वाणवसा घेण्यास विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गर्दी झाली होती. या सुवासिनी महिलांमुळे मंदिर परिसर फुलला होता. विशेष म्हणजे, पंढरीतील खास वैशिष्ट्य असलेला लाखेचा चुडा भरण्यास महिलांची झुंबड उडाली होती.  मंदिर समितीने वाण ओवसण्याकरिता पहाटे साडेचार ते सात वाजेपर्यंत राखीव वेळ ठेवली होती. तसेच तीन हजार 500 महिला भाविकांचे ऑनलाइन बुकिंग झाले होते. महिलांनी मंदिरात वाणवसा देऊन मकर संक्रांतीचा उत्साह आनंदाने लुटला.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महिलांनी सुगडामध्ये हळद - कुंकू , तीळगूळ, गाजर, बोर, उसाच्या कांड्या, पावटा, गव्हाच्या लोंब्या, शेंगा, हरभरा, घेवडा घेऊन आलेल्या सुवासिनी प्रथम रुक्मिणी मातेला ओवाळतात नंतर दुसर्‍या सुवासिनींना ओवसा घेतात. विड्याच्या पानावर खोबरे, खारीक, बदाम, सुपारी, हळदीकुंकू ठेवून पाच सौभाग्यवतींच्या हातून ओटीत घालतात.  यावेळी महिला एकमेकांना तीळगूळ देऊन आलिंगन घेताना दिसत होत्या. मंदिर परिसरात स्थानिकांसह  परगावच्या महिलांची लाखेचा चुडा व बांगड्या भरण्यास गर्दी झाली होती .ज्ञानेश्‍वर दर्शन मंडपाचे पाच मजले भरून दर्शन रांग सारडा भवनापर्यंत गेली होती. बस , रेल्वे , खाजगी वाहनाने यांनी महिला दाखल झालेल्या होत्या . दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महिलांच्या गर्दीत वाढ झाली . त्यामुळे महिलांनी मंदिर परिसर गजबूजून गेला होता .