Sat, Apr 20, 2019 10:11होमपेज › Solapur › प्रांताधिकार्‍यांवर वाळूचा टिपर घालून खुनाचा प्रयत्न

प्रांताधिकार्‍यांवर वाळूचा टिपर घालून खुनाचा प्रयत्न

Published On: Jan 06 2018 1:28AM | Last Updated: Jan 05 2018 9:43PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

अवैध वाळूची वाहतूक रोखण्यासाठी कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकार्‍यांच्या अंगावर वाळूचा टिपर घालून खुनाचा प्रयत्न करण्यात  आल्याची  घटना  गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास होटगी रोडवरील बसवेश्‍वर नगरजवळील लोखंडवाला प्रेस्टिज येथे घडली.याबाबत प्रांताधिकारी शिवाजी नवनाथ जगताप (रा. बसवेश्‍वरनगर, होटगी रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टिपरचालक (क्र. एमएच 12 पीझेड 7347) व इतर तिघांविरोधात विजापूर नाका पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिवाजी जगताप हे उपविभागीय अधिकारी (प्रांत) सोलापूर क्र. 1 म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास वाहनातून ते उत्तर सोलापूरचे तहसीलदार रणवरे, शेळगीचे मंडल अधिकारी गायकवाड, मजरेवाडीचे तलाठी माने हे होटगी रोडवरील सिद्धेेश्‍वर साखर कारखान्याच्या समोरील रस्त्यावर थांबून होटगी गावाकडून सोलापूर शहरात येणार्‍या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी थांबले होते. त्यावेळी मजरेवाडीजवळील बसवेश्‍वरनगर येथील लोखंडवाला प्रेस्टिज येथे नवीन बांधकामाच्या ठिकाणी अवैध वाळूचा टिपर येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी जगताप यांना मिळाली. त्यामुळे सर्व जण वाहनातून नवीन बांधकामाच्या ठिकाणी गेले.

त्यावेळी बांधकामाच्या ठिकाणी  टिपर वाळू घेऊन आला. त्यामुळे अधिकार्‍यांनी टिपरचालकाकडे वाळूच्या परमिटची पावती विचारली. त्यावेळी चालकाने त्याचे नाव सांगून पावती नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाळूने भरलेला टिपर हा पोलिस ठाण्यास घेऊन चल, असे सांगितले असता चालकाने टिपरमधील सुमारे 4 ब्रास वाळू लोखंडवाला प्रेस्टीज येथेच ओतून टाकली.

त्यावेळी टिपर चालक व त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी प्रांताधिकारी जगताप यांना धक्‍काबुक्‍की करून बाजूला सरक नाही तर तुला सोडणार नाही, अशी दमदाटी करीत जगताप यांच्यासोबत असलेल्या शासकीय अधिकार्‍यांनासुद्धा दमदाटी केली. चालकाने टिपर प्रांताधिकारी जगताप यांच्या अंगावर घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जगताप हे बाजूला झाल्याने बचावले. त्यावेळी चालकाने टिपर घेऊन तसेच त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून पळ काढला. म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.

वाळूचोरीवर प्रभावी कारवाई होईल का?

सोलापूर जिल्ह्यात वाळूचोरीचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः कडक शब्दांमध्ये वाळूचोरीवर कारवाई करण्याच्या सूचना महसूल, पोलिस, आरटीओ विभागाला दिलेल्या आहेत. तरीही वाळूचोरी होतच आहे. महसूल, पोलिस विभागातील काही लोकांमुळे वाळूचोरांवरील कारवाईत कमतरता निर्माण होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त, पोलिस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून वाळूचोरांवर प्रभावी कारवाई करण्याची गरज आहे.