Wed, Sep 18, 2019 21:51होमपेज › Solapur › पंधरा वर्षे विना वेतन राबणाऱ्या प्राध्यापकांचे पावसाळी अधिवेशनाकडे लक्ष

उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाची तरतूद होणार ?

Published On: May 26 2019 5:38PM | Last Updated: May 26 2019 5:38PM
करकंब : भीमा व्यवहारे

राज्यातील  उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांचे मूल्यांकन सन २०१४ मध्ये झाले होते, त्यातील फ़क्त १२३ शाळा व २३ तुकड्यांची यादी शासनाने अनुदान पात्र म्हणून जाहीर केली. परंतु, मूल्यांकन झालेल्या  इतर शाळा व तुकड्यांची अनुदानास पात्र म्हणून यादी  अद्याप घोषित केली नाही व एकाही उच्च माध्यमिक शाळा व तुकडीवर काम करणाऱ्या प्राध्यापकाला वेतनाची तरतूद सरकारने केली नाही. पाच वर्षात दहा वेळा तपासणी करून माहिती घेतलेल्या शाळांची यादी जाहीर होऊन येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागण्यामध्ये अनुदानाची तरतूद होईल का? याकडे प्राध्यापकांचे लक्ष लागले आहे.

पावसाळी अधिवेशन १७ जून पासून सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला भरपूर यश आले आहे. तसेच राज्यातील विधानसभा निवडणूक ही सहा महिन्यात आहे. त्यामुळे निवडणूक पूर्व अधिवेशनात आपल्याला न्याय मिळेल. या आशेवर राज्यातील दहा ते पंधरा वर्षे विना वेतन राबणारे सुमारे दहा हजार शिक्षक चातकासारखी अनुदानाची  वाट पाहात आहेत.

अधिवेशनात पूरक मागण्या सादर करण्यासाठी वित्त विभागाने व्यय शाखेकडून अर्थसंकल्प शाखेकडे प्रस्ताव अंतिमत:  मंजुरी साठी दि ०३ जून पर्यंत पाठविण्याच्या सूचना परिपत्रकाव्दारे संबंधितांना दिल्या आहेत. पुरवणी मागणी प्रस्तावांमध्ये उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना यादीसह अनुदानाची तरतूद व्हावी यासाठी शिक्षक प्रतिनिधी व संघटना प्रयत्न करीत आहेत.

प्राध्यापकांच्या सहनशीलतेचा अंत -शाहूराजे पाटील

कायम विना अनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेल्या उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवर काम करणाऱ्या शिक्षकांवर शासनाने सातत्याने अन्याय केला आहे. सन २००९ मध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळा व तुकड्यांचा कायम शब्द काढला. परंतु, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांचा कायम शब्द काढला नाही. पाच वर्षांनी म्हणजे सन २०१४ मध्ये उच्च माध्यमिकचा कायम शब्द काढून मूल्यांकन केले. परंतु, त्यालाही पाच वर्षे होत आली अद्याप पात्र म्हणून यादी लावली नाही व अनुदानाची तरतूद केली नाही. आज ना उद्या होईल या आशेवर पंधरा वर्षे विना वेतन सेवा केली आता मात्र सहनशीलतेचा अंत होत आहे. 
प्रा शाहूराजे पाटील 
अध्यक्ष, उच्च माध्यमिक शाळा कृती समिती सोलापूर