Wed, Jul 24, 2019 12:29होमपेज › Solapur › पोलिसांनाच का दोष द्यावा?

पोलिसांनाच का दोष द्यावा?

Published On: Mar 19 2018 10:29PM | Last Updated: Mar 20 2018 9:40AMपंढरपूर : नवनाथ पोरे

अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची भर दिवसा शहरात गर्दीमध्ये घूसून गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे दोन दिवस झाले संपूर्ण पंढरपूर शहर गोठलेल्या अवस्थेत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्यामुळे संपूर्ण बाजारपेठ दोन दिवस झाली ओस पडली असून लोक घराबाहेर पडायला तयार नाहीत. जवळून जाणार्‍या नवख्या माणसाकडेही संशयाने पाहिले जाऊ लागले आहे. ज्यांचे हातावर पोट आहे अशा रस्त्यावरील विक्रेत्यासोबतच ज्यांनी करोडो रूपयांची गुंतवणूक करून व्यवसाय थाटले आहेत त्यांचेही गेल्या दोन दिवसांत करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोशल मीडियावरून ही घटना लगेचच जगजाहीर झाल्यामुळे पंढरपूरात विठ्ठल दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचीही संख्यासुद्धा दोन दिवसात कमालीची घटली आहे. पंढरपूर शहरासाठी ही परिस्थिती नवी नाही किंवा हे पहिल्यांदाच घडते आहे असेही नाही. गेल्या तीन-चार दशकांपासून पंढरपूरला टोळी युद्धाची काळी पार्श्‍वभूमी आहे. दर काही महिन्यांनी हे टोळी युद्ध डोके वर काढते आणि पंढरपूरकरांना वेठीस धरले जाते. या प्रकरणी आता राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत पोलिसांना लक्ष्य केले जाईल आणि त्यांच्यावर निष्क्रीयतेचा ठपका ठेवला जाईल. संदीप पवार यांची हत्या होण्यासही पुन्हा पोलिसांना जबाबदार धरले जाईल. परंतु त्याचवेळी पंढरपूर शहरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती  या एकूण अवस्थेला कारणीभूत असल्याचे वास्तव कोणालाही नजरेआड करता येणार नाही.
गेल्या वर्षभरात पंढरपूर शहरातील हा तिसरा हाय प्रोफाईल मर्डर आहे. आणि त्यापूर्वीच्या वर्षातही पंढरपुरात असे थरकाप उडवणारे खून सातत्याने होत आलेले आहेत. त्यामुळे पंढरपूरकरांना आता गुन्हेगारी आणि गुंडगिरी, त्यातून होणार्‍या हाणामार्‍या, टोळक्याने फिरून दहशत बसवणे, सर्वसामान्यांसह व्यापारी, विक्रेत्यांना वेठीस धरणे सवयीचे होऊन गेलेले आहे. अशा काही घटना घडल्या की, पोलिसांच्या निष्क्रीयतेकडे बोट दाखवून नामानिराळे होण्यापूर्वी पंढरपूरच्या राजकीय व्यवस्थेने, सामाजिक नेत्यांनी, पोलिस ठाण्यात जाऊन पुढारपण दाखवणार्‍या समाजधुरिणांनी कधी तरी आपल्याकडेही पाहिले पाहिजे. ही परिस्थीती निर्माण होण्यास आपणही कारणीभूत आहोत या अर्थाने आता पंढरपूरच्या नेतृत्वानेही विचार करण्याची वेळ आलेली आहे.  सततच्या गुन्हेगारी  घटनांमुळे पंढरीची राज्यभरात बदनामी होत असून येथील राजकीय नेतृत्वाचे हे अपयश मानावे लागेल. गुन्हेगारी प्रवृत्ती का फोफावतात, त्यांना खतपाणी कुठून आणि कसे मिळते, कोणत्या परिस्थितीत मिळते याचाही विचार आता पंढरपूरच्या सामाजिक धुरिणांनी केला पाहिजे. निवडणुका आल्या की समाजाचे ठेके घेऊन मतांच्या पेट्या मिरवणारे नेते कोणत्याही गुन्ह्यात आपल्या समाजातील युवकाचे नाव आले की त्याला सोडवायला पोलिस ठाण्यात जातात.  जेव्हा ही तरूण मुले रस्त्यावर तलवारी घेऊन हैदोस घालतात, बेभान गाड्या उडवतात, वाळू तस्करी करतात, बेकायदा दारू विकतात, जुगाराचे अड्डे चालवतात, खासगी सावकरकी करून सर्वसामान्यांना पिळून काढतात तेव्हा हे सामाजिक नेतृत्व त्यांना या वाईट मार्गावर जाण्यापासून का रोखत नाही? कोणत्याही गुन्हेगाराची सुरूवात सामान्य चुकीतून होत असते आणि त्या चुकीच्या प्रसंगी हे नेते त्यांना पाठिशी घालतात. किंवा गुन्हेगार उभा राहत असताना त्याला भरीस घालण्याचे काम करतात आणि हे वास्तव कोणत्याही सामाजिक पुढार्‍यास नाकारता येणार नाही. 

जसे हे सामाजिक पुढार्‍यांचे अपयश आहे  तसेच येथील राजकीय नेतृत्वाचेसुद्धा हे अपयश असल्याचे मान्य करावे लागते.  गेल्या तीन-चार दशकांत पंढरपूरचे नेतृत्व ज्यांनी केले त्यांनी पंढरपूरच्या युवकांना काम मिळावं, त्याच्या रोजी रोटीचं साधन सन्मानजनक असावं, त्याला इथंच सुखान वास्तव्य करता यावं याकरिता किती प्रयत्न केले हा संशोधनाचा विषय आहे. पंढरपूर शहराची लोकसंख्या  वेगाने वाढते आहे. उच्च शिक्षणाची कवाडे मोठया प्रमाणात खुली झालेली आहेत त्यामुळे सुशिक्षीत बेरोजगारांचीही संख्या वाढते आहे. या बेरोजगार हातांना येथे पुरेशा प्रमाणात काम नसल्याचे नाकारता येत नाही. आजच्या युवा पिढीला  चुरमुरे, बत्तासे विकून आणि चंद्रभागेच्या वाळवंटात बुक्का, गंध लावून उदरनिर्वाह करणे मान्य नाही. त्यांच्या बदलत्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षानुरूप वातावरण निर्मीती करण्यात  त्यांना संधी निर्माण करण्यात स्थानिक नेतृत्वास अपयश आलेले आहे. निवडणूक आली की या नेत्यांकडून वॉर्ड आणि गावगन्ना जातीच्या मतांची बेरीज-वजाबाकी केली जाते. प्रत्येक बुथला मताधिक्य मिळवून देईल अशा साम, दाम, दंड, भेद वापरणार्‍या कार्यकर्त्यांची गरज भासते, म्हणून त्यांच्याकडूनही उभा राहणार्‍या  अशा गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केले जाते.  गेल्या काही वर्षात तर पंढरपूरच्या राजकीय नेतृत्वाकडून उघडपणे तर कधी छुपेपणाने अशा प्रवृत्तीचे समर्थन झाल्याचे दिसून आले आहे. गुन्हेगारांना निवडणूकीत उमेदवार्‍या देऊन निवडून आणण्यापर्यंत आता राजकीय नेतृत्वाची मजल गेली आहे त्यामुळे या पेरणीतून चांगल्या पिकाची उपज होईलच कशी ? आणि अशा प्रकारचे सामाजिक, राजकीय तण माजल्यानंतर पोलीस प्रशासन तरी त्याला आळा कसे काय घालू शकेल ?  राजकीय आणि सामाजिक आश्रय घेऊन गुन्हेगारी बलदंड झालेली असताना पोलीसांना दोष देणे म्हणजे रोग रेड्याला आणि इंजेक्शन पखालीस असा मामला आहे. ज्यादिवशी पंढरपूरच्या प्रश्‍नावर समर्पक उत्तरे शोधली जातील, त्यानुसार अंमल केला जाईल, सामाजिक नेते मंडळी आपल्या कार्ट्यांचे कान जागीच उपडतील त्याच दिवशी पंढरपूरातील खून सत्र थांबणार आहे. अन्यथा विठोबासुद्धा पंढरीला वाचवू शकणार नाही.