Fri, Aug 23, 2019 21:07होमपेज › Solapur › विषबाधेने मृत्युमुखी पडलेल्या 40 मोरांची पिसे गेली कुठे? 

विषबाधेने मृत्युमुखी पडलेल्या 40 मोरांची पिसे गेली कुठे? 

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 9:20PMवैराग : आनंदकुमार डुरे

मालेगाव, ता. बार्शी येथे शिकारीच्या उद्देशाने राष्ट्रीय पक्षी मोरासह तब्बल तीस पक्षांचा  मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी 4 ऑगस्ट रोजी उघडकीस आला. राष्ट्रीय पक्षी मोरासह अनेक पक्षांचे नुसते सांगाडेच सापडले असले तरी मोरांची बहुंताश पिसे गायब झाली आहेत. त्यामुळे नेमकी शिकारीसाठी विषबाधा झाली की अन्य कारणांसाठी हे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच कळणार 
आहे.

वैराग-उस्मानाबाद मार्गावरील  मालेगाव येथील घोडके वस्तीवर शनिवारी अनेक पक्षांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यावर वन विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रीय पक्षी मोर, लांडोर, तितर, भारतद्वाज, व्हाला, लवर्‍या यांचाही मृत पक्षांमध्ये समावेश असल्याचे निदर्शनास आले. यातील काही पक्षांचे कुजलेल्या अवस्थेतील सांगाडे याठिकाणी दिसून आले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रीय पक्षी मोराचे सांगाडे सापडले असले तरी त्यांची पिसे मात्र मिळून आलेली नाहीत, मग ही पिसे नेमकी गेली कुठे? 
 याबाबत खासगीमध्ये अधिक चौकशी केली असता असे समजले की, मोरांची शिकार ही मोरांच्या मांसासाठी करण्यात येते. मोराच्या मांसाला जास्त किंमत मिळते, तर मोरांचे पंखसुद्धा शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी वापरण्यात येत असल्याने त्यांनाही चांगला भाव मिळतो. याठिकाणी शिकारीच्या उद्देशाने मोर व इतर पक्षांची शिकार करण्यासाठी धान्यातून विष प्रयोग केला असावा, अशी शक्यता व्यक्त होते. पण धान्यामध्ये विषाचे प्रमाण जास्त झाल्याने पक्षांचा मृत्यू झाला असावा. दरम्यान, मृत तितर पक्षाचे शवविच्छेदन करून त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्याच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. याठिकाणचा अहवाल आल्यावरच पक्षांचा मृत्यू कशाने झाला असावा, हे उघड होणार आहे. याप्रकरणी  वन विभागाच्यावतीने अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.