Fri, Apr 26, 2019 19:39होमपेज › Solapur › ग्रामीणच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांना मुहूर्त कधी?

ग्रामीणच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांना मुहूर्त कधी?

Published On: Jul 09 2018 11:07PM | Last Updated: Jul 09 2018 10:35PMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनवाहिनी बनलेल्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्य सहायकांची असंख्य पदे रिक्त असून या रिक्तपदांमुळे संबंधित आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या रुग्णसेवेवर ताण पडत आहे. 

जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये तब्बल 14 डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. तेथे तात्पुरत्या स्वरुपात करार पद्धतीवर ‘बॉण्डेड डॉक्टर’ कार्यरत आहेत. जिल्ह्यात आरोग्यसेविकांची 145, तर आरोग्य सहायकांची 13 पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील विविध 3 आरोग्य केंद्रांचे कामकाज डॉक्टरांविना सुरू आहे. विविध 7 आरोग्य केंद्रांत फक्त एकच डॉक्टर कार्यरत आहे. या रिक्त पदांमुळे आरोग्य विभागावर मोठा ताण आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा कणा असलेल्या आरोग्य विभागासाठी शासनाकडून 683 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 438 पदांवर कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. आरोग्य सहायकांच्या मंजूर असलेल्या 77 पदांपैकी 64 आरोग्य सहायक पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील विविध 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांत 154 डॉक्टरांची पदे मंजूर असून त्यापैकी तब्बल 14 पदे रिक्त आहेत. 

ग्रामीण भागात प्रसूतिगृहेही वार्‍यावर

जिल्ह्यात शासनाच्या मंजुरीनंतर अनेक ठिकाणी प्रसूतिगृहांच्या इमारती बांधण्यात आल्या. मात्र अनेक पदे रिक्त असल्याने अनेक ठिकाणी प्रसूतिगृहे बंद असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तेथे आरोग्यसेवा देताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी रुग्णांना आरोग्यसेवेपासून मुकावे लागत आहे. 

सांगोला तालुक्यातील महूद, माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस, बोरगाव, महाळुंग व पिलीव, माढा तालुक्यातील उपळाई (बु.), अक्कलकोट तालुक्यातील दुधनी, चपळगाव व वागदरी आदी ठिकाणी डॉक्टर, आरोग्य सहायक, आरोग्यसेविकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे तेथे आरोग्यसेवेवर प्रचंड ताण येत असल्याने त्याचा रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. ही सर्व पदे दीर्घ काळापासून रिक्त असून त्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून शासनाकडे रिक्त पदे भरण्याची अनेकदा मागणीही करण्यात आली आहे. मात्र ही पदे भरण्यासाठी अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसत आहे. 

जिल्ह्यातील स्थिती

जिल्ह्यात एकूण 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 437 आरोग्य उपकेंद्रे आहेत. त्यापैकी आरोग्य सहायकांची एकूण 13 पदे रिक्त आहेत. आरोग्यसेविकेंची 245 पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात डॉक्टरांची 14 पदे रिक्त आहेत.