Wed, Jul 17, 2019 12:00होमपेज › Solapur › संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे भक्‍तिभावात स्वागत

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे भक्‍तिभावात स्वागत

Published On: Jul 19 2018 1:40AM | Last Updated: Jul 18 2018 10:04PMकुर्डुवाडी : प्रतिनिधी

संपूर्ण दिंड्या-पालख्यातील तीन क्रमांकाच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे माढा तालुक्यात मुंगशी येथे मोठ्या भक्‍तिभावाने स्वागत करण्यात आले. या पालखीने बुधवारी कुर्डुत मुक्‍काम केला. गुरुवारी कुर्डुवाडीत भगवानगड व नारायणगड या पालख्या येणार आहेत. 

पंढरीची नामदेव पायरी असलेल्या कुर्डुवाडी शहरात वारकर्‍यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी संत गुलाबराव महाराज (चांदूरबाजार, अमरावती) व रामनाथ महाराज (वाढोणा, अमरावती), साधू महाराज (कंधार, वाशीम) दिंड्यांनी शहरात भक्‍तिमय वातावरण निर्माण केले. गुरुवारी भगवानगड (बीड), संत गुलाबबाबा (काटेलधाम, बुलढाणा), नारायणगड (बीड) या दिंड्या कुर्डुवाडी शहरात येणार आहेत. 28 जुलै रोजी परतीच्या मार्गावरील संत गजानन महाराजांची पालखी शहरात येणार आहे.

मंगळवारी परंडाहून मुंगशीत माढा तालुक्यात प्रवेश केलेल्या संत गजानन महाराज पालखीचे स्वागत प्रांताधिकारी मारुती बोरकर, तहसीलदार सदाशिव पडदुणे, गटविकास अधिकारी गोपाळदास बैरागी, सभापती विक्रमसिंह शिंदे, सरपंच किरण मोरे, बंडू ढवळे यांनी केले. सायंकाळी कुर्डुत पालखीचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच चंद्रकांत जगताप, उपसरपंच संदीप पाटील, राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बेंद शिवारातील रेल्वे रुळावर केला भराव

संत एकनाथ महाराजांच्या पालखीला कुर्डुत येण्यासाठी बेंद शिवारातील रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. बैलगाडीची पालखी व सुमारे दहा हजार वारकर्‍यांना मोठी कसरत करावी लागत होती. याबाबत गतवर्षी आंदोलनही झाले होते. मंगळवारी रेल्वे व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचार्‍यांनी रुळाच्या दोन्ही बाजूला मुरुमाचा भराव व खडी टाकून वारकर्‍यांची सोय केली.

पालखी मार्गावर खड्डेच खड्डे

कुर्डुवाडीत विदर्भ, मराठवाड्यातून येणार्‍या दिंड्या-पालख्यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरु आहे. असे असताना शहरातील पालखी मार्गावरील खड्डे ‘जैसे थे’ आहेत. नगरपालिकेने तात्पुरती रस्त्यांची डागडुजी करणे आवश्यक होते. मात्र याकडे प्रशासन व पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. हे खड्डे दिंड्या-पालख्यांना अडथळा ठरत आहेत. त्याशिवाय डास प्रतिबंधक फवारणी झालेली दिसत नाही.