Sun, Jul 21, 2019 09:54होमपेज › Solapur › मुक्‍ताबाईंच्या पालखीचे बार्शी तालुक्यात स्वागत

मुक्‍ताबाईंच्या पालखीचे बार्शी तालुक्यात स्वागत

Published On: Jul 19 2018 1:40AM | Last Updated: Jul 18 2018 8:53PMबार्शी : गणेश गोडसे 

पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी निघालेल्या संत मुक्‍ताबाई यांच्या पालखीने आज सोलापूर जिल्ह्यातील शेंद्री येथुन जवळच असलेल्या वारदवाडी फाट्यावरून जिल्ह्यात प्रवेश केला. सर्वात दीर्घ प्रवास असलेला दरकोस, दर मुक्‍काम, एक एक पाऊल मागे टाकत, विठूनामाच्या ध्यासामध्ये तल्लीन होऊन बरेच अंतर पार करत संत मुक्‍ताबाई पालखी सोहळा विठ्ठलाच्या सोलापूर  जिल्ह्यात  दाखल झाला आहे. 

श्री  संत मुक्‍ताबाई  समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी मुक्‍ताईनगर  जि. जळगाव  येथून 18 जून रोजी  प्रस्थान  ठेवलेला हा मानाचा पालखी  सोहळा उस्मानाबाद जिल्ह्यातील वाकडी येथील शेवटचा मुक्‍काम आटोपून सोलापूर जिल्ह्यात शेंद्री या गावात दाखल होताच गावातील आबालवृद्धासह परिसरातील भजन मंडळासह ग्रामस्थांनी मुक्‍ताबाई,  मुक्‍ताबाई चा  जयघोष करत उत्साहात  स्वागत   केले. प्रवासाचे थोडेच अंतर शिल्लक राहिले असल्यामुळे वारकरी  भाविकांना  विठूरायाची  दर्शनाची ओढ तीव्र झालेली दिसत होती.

तहसीलदार ऋषिकेत शेळके, पंचायत समिती सभापती कविता वाघमारे, उपसभापती अविनाश मांजरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जोगदंड,शेंद्री ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चंपाबाई मदने, महेश चव्हाण,स.पो.नि. रवींद्र खांडेकर, यांनी पालखीचे स्वागत केले. मंगळवारी  दुपारी 2.15  वाजता मुक्‍ताबाई यांच्या पालखीचे सोलापूर जिल्हा हद्दीत आगमन झाले. तर दुपारी पालखी शेंद्री गावात पोचली.शेंद्री येथे आज पालखीचा मुक्‍काम असतो. सायंकाळी शेंद्री येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने दिंडीमधील वारकर्‍यांना अन्नदान केले जाते. बुधवारी  सकाळी शेंद्री येथून पालखी पुढे मार्गस्थ होते. 

यावेळी ग्रामसेवक सी. बी.गावडे, मच्छिंद्र बारबोले,तानाजी निंबाळकर, सूर्यकांत बारबोले, रूपेश निंबाळकर,दत्ता मदने,संभाजी चव्हाण, धनंजय निंबाळकर,  यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य भाविक उपस्थित होते. जिल्हा प्रवेशानंतर पंढरपूरपर्यंत वीस कर्मचारी व एक सहायक  पोलिस निरीक्षक सोबत देण्यात येणार आहे तसेच दोन पाण्याचे टँकर दिले जाणार आहेत. संत निवृत्ती महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत सोपान काका , मुक्‍ताबाई , संत एकनाथ महाराज , संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराज या सात संतांच्या मांदीयळीत संत मुक्‍ताईला विशेष महत्त्व आहे.जवळपास 34 दिवस पायी चालत साडेसातशे किलोमीटर प्रवास पूर्ण केला जातो ही शेकडो वर्षाची परंपरा आहे. पंढरपुरमध्ये संत नामदेवराय हे या सोहळ्याला सामोरे येतात आणि संत मुक्‍ताई आणि संत नामदेवराय हे वाखरीला इतर संताना सामोरे जातात.