Mon, Apr 22, 2019 03:48होमपेज › Solapur › बेकायदेशीर सावकारीविरुद्ध आमच्याकडे या

बेकायदेशीर सावकारीविरुद्ध आमच्याकडे या

Published On: May 23 2018 12:15AM | Last Updated: May 23 2018 12:15AMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरात खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या होत आहेत. त्यांच्या जाचातून सुटका करण्यासाठी त्रस्त युवक, नागरिकांनी आमच्याकडे या, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. खासगी बेकायदेशीर सावकारीविरोधात आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघ येथे मंगळवारी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बेकायदेशीर खासगी सावकार आणि त्याला जबाबदार प्रशासन यावर हल्लाबोल केला.

पुढे आमदार  शिंदे म्हणाल्या, सोलापुरात सुशिक्षित तरुणांना रोजगार नाही. त्यांना सावकारांकडून पैसे घ्यावे लागतात. परिणामी बेकायदेशीर सावकारी वाढली आहे. या सावकांराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारणे, दमदाटी करणे, मारहाण करणे, अधिक पैसे वसूल करणे, असे प्रकार घडत आहेत. याला कंटाळून तरूण आत्महत्या करत आहेत. तरी यातील त्रस्त तरुणांनी खासगी बेकायदेशीर सावकारीला बळी पडू नये. आत्महत्येचा दुर्दैवी मार्ग पत्करू नये. त्यांचा त्रास सहन न करता आमच्याशी संपर्क करावा, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी तरूणांना केले आहे. 

यातील त्रस्त तरुणांना शासनाच्या विविध योजना, पंतप्रधान स्वयंरोजगार योजना, जिल्हा उद्योग केंद्राकडून आर्थिक सहाय्य, मुद्रा लोन आदी योजना बँका सध्या जुजबी लोकांना व दाखवण्यापुरत्याच मंजूर करत आहेत. खरा घटक वंचित राहात आहे. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी, व्यवसायासाठी, रोजगारासाठी खासगी सावकारांकडे जावे लागत आहे. परंतु यापुढे तरूणांनी आमच्याकडे यावे. त्यांना शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आमच्याशी संपर्क साधून त्रास देणार्‍या सावकारांची नावे सांगा त्यांची यादी प्रशासनाकडे कारवाईसाठी देऊ. सावकारी मोडीत काढू, असेही आ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.या पत्रकार परिषदेस सुदीप चाकोते, गणेश डोंगरे, व्यंकटेश पडाळ, बाबा करगुळे, मनिष गडदे, बोद्धूल आदी उपस्थित होते.