होमपेज › Solapur › शहराला आजपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा

शहराला आजपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा

Published On: Jun 11 2018 1:09AM | Last Updated: Jun 10 2018 10:29PMसोलापूर : प्रतिनिधी 

गत महिनाभरापासून पाणीटंचाई तसेच बत्ती गुल होत असल्यामुळे शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सोमवार, दि. 11 जूनपासून पुन्हा पूर्ववत म्हणजे तीन दिवसांआड करण्यात येणार आहे.

उजनी धरणातून 29 मे रोजी सोडण्यात आलेले पाणी शुक्रवारी सकाळी औज बंधार्‍यात दाखल झाले. तद्नंतर सायंकाळी हा बंधारा ओव्हरफ्लो झाला. भरून वाहणारे पाणी खालच्या चिंचपूर बंधार्‍यात भरायला सुरुवात झाले. शनिवारी सकाळी चिंचपूरचा बंधारादेखील पूर्ण क्षमतेने भरला. औज, चिंचपूर बंधार्‍यात साडेचार मीटरपर्यंत पाणी साठविण्याची क्षमता आहे. दरम्यान, हे दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने मनपा प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. कारण, गत महिन्यापूर्वी शहराचा पाणीपुरवठा टंचाईमुळे चार दिवसांआड करण्यात आला होता. टाकळी जॅकवेलची लेवलही कमी झाल्याने नियोजन कोलमडले. गत दहा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा चक्‍क पाच दिवसांआड करण्यात आला. यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले. काही भागात चक्‍क सहा-सात दिवसांआड पाणीपुवठा होत असल्याची तक्रार होती. 

या पार्श्‍वभूमीवर उजनीचे पाणी दहा दिवसांनी औज बंधार्‍यात पोहोचल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. सोमवारपासून शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.