Thu, Aug 22, 2019 14:35होमपेज › Solapur › माळशिरस तालुक्यात 13 गावांना टँकरने पाणीपुरवठा

माळशिरस तालुक्यात 13 गावांना टँकरने पाणीपुरवठा

Published On: May 16 2019 2:14AM | Last Updated: May 16 2019 2:14AM
माळशिरस : अनंत दोशी 

 गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात बागायती तालुका म्हणून ओळख असलेल्या माळशिरस तालुक्यात आता दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाणी व चार्‍याचा प्रश्‍न तालुक्याच्या काही भागांत जाणवू लागला असून नीरा उजवा कालवा जाणार्‍या भागात याची तीव्रता कमी असली तरी दुष्काळजन्य परिस्थिती जाणवू लागली आहे. तालुक्यातील 13 गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरु असून 2 चारा छावण्यांना मंजुरी मिळाली आहे. 8 लाख 16 हजार जनावरांना चारा व पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

माळशिरस तालुका तसा पर्जन्य छायेतील तालुका. त्यामुळे या तालुक्यात चांगला पाऊस पडतो, तो ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये. परंतु वीर, भाडगर, नीरा, देवधर या धरणांचा कालवा तालुक्यातून गेल्यामुळे बर्‍याच भागात पाण्याची कमतरता तशी फारशी जाणवत नाही. परंतु, गेल्या काही वर्षांत तालुक्यातील शेतीचे क्षेत्र वाढत गेल्याने त्याचा ताण या धरणाच्या कालव्यावर पडल्याने त्या भागालाही पाण्याची कमतरता जाणवू लागली. तसेच तालुक्याच्या पूर्व भागाला उजनी धरणाचे पाणी मिळत असल्याने तेथेही काही प्रमाणात दुष्काळ जाणवत नव्हता. परंतु, यंदा राज्यात पडलेल्या दुष्काळाचे चटके तालुक्यात ही जाणवू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यातच कधी आभाळ तर कधी कडक ऊन असा निसर्गाचा खेळ सुरु असल्याने तालुक्यातील पाण्याची पातळी कमी होत आहे .
तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती जाणवू लागली आहे. तालुक्यात द्राक्ष, केळी, चिकू यांसह फळबागांचे प्रमाण बरेच वाढले आहे. परंतु, यंदाच्या दुष्काळामुळे अनेक फळबागा नामशेष होत चालल्या आहेत. भाजीपाल्याची अवस्था तीच आहे. सध्या भाजीपाल्याला चांगला दर आहे. रोज ताजा पैसा यामधून मिळत असतो. त्यामुळे अनेक लहान शेतकरी भाजीपाल्याकडे वळतात. परंतु, पाण्याची कसलीही सोय नसल्याने त्यांना रोज मिळणारा ताजा पैसा बंद झाला आहे. तालुक्याच्या पश्‍चिमेकडील डोंगरी भागातील माणकी, भांब, रेडे, गारवाड या भागात उन्हाळी कांदा लागवड होते. परंतु, यंदा कांदा लागवड अगदी अल्प प्रमाणात झाली आहे. या भागातील अनेक लोकांनी रोजगारासाठी मुंबई, पुणे, या भागात स्थलांतर केले आहे. तसेच या भागात मेंढ्या पालन अनेक शेतकरी करतात. त्यांनी आपल्या मेंढ्यांच्या 
कळपासह स्थलांतर केले आहे. तालुक्यात अनेक गावांतून पाणी टँकरची मागणी वाढत चालली आहे. प्रशासन त्या द‍ृष्टीने पावले टाकत आहे. परंतु, काही भागात प्रशासनाकडून लवकर टँकर उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी मागणी होताच त्वरित टँकर देणे गरजेचे आहे.

माळशिरस तालुक्यात पाच साखर कारखाने आहेत. त्यामुळे उसाचे क्षेत्र मोठे आहे. तालुक्यात साधारण 35 ते 40 लाख टन उसाचे गाळप होते. परंतु, यंदा पडलेल्या दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र कमी होणार असून ज्यांच्याकडे उस आहे. तो चारा छावणीला जात असल्याने पुढील हंगामात कारखान्यांना उसाची कमतरता भासणार आहे . तालुक्यात दरवर्षी सरासरी 465 मिलीमिटर पाऊस पडतो. परंतु, यंदा फक्‍त 160 मिलीमिटर पाऊस झाल्याने खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेले. 

माळशिरस  तालुका  हा मोठा क्षेत्रफळ असलेला तालुका आहे. तालुक्यात एकूण 113 गावे आहेत. गेल्या वीस वर्षांत सर्व गावांत शासनाच्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्याने सन 2008 साली तालुका टँकरमुक्‍त झाला होता. परंतु, नंतर यातील अनेक योजना बंद झाल्याने आता टँकरची गरज जाणवू लागली. त्यातल्या त्यात तालुक्याच्या पश्‍चिम भागात जास्त गरज निर्माण झाली. आज तालुक्यात 13 गावांत 15 टँकर चालू असून रोज प्रत्येक गावात दोन टँकरच्या खेपा होत आहेत. तालुक्यात भांब, गारवाड, मगरवाडी, जळभावी, बचेरी, शिंगोर्णी, रेडे, पिंपरी, कोथळे, पठाणवस्ती, लोंढे मोहितेवाडी, फडतरी, गिरवी, लोणंद या तेरा गावांत टँकर चालू आहेत. 

माळशिरस तालुक्याचे एकूण क्षेत्र 1 लाख 60 हजार 802 हेक्टर आहे. त्यामध्ये खरिपाचे 7 हजार 766 हेक्टर, रब्बीचे 65 हजार 427 हेक्टर, उसाचे 19 हजार 253 हेक्टर व उन्हाळी पिकाचे 700 हेक्टर आहे. या वर्षी उन्हाळी हंगामात 31.36 टक्के पेर झाली असून त्यामध्ये मका 1109 हेक्टर, बाजरी 11 .30 हेक्टर, भुईमूग 156.50 हेक्टर, ऊस 3 हजार 894 हेक्टर, चारा 1181 हेक्टर, घास 9 हेक्टर, कडवळ 1499 हेक्टर, चारा पीके 2712 हेक्टर वर पेर झाली आहे.

सध्या भाटगर धरणात 7.28, वीर 18.97 व नीरा देवधर मध्ये 2 .8 टक्के पाणीसाठा असून आता उन्हाळी दुसरे आवर्तन येणार का? असे शेतकरी वर्ग बोलत आहे. तालुक्यात मोठे गाव तलाव 20, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे 84, पाझर तलाव 98 व सिमेंट बंधारे 125 आहेत. परंतु, यात पाणीसाठा अजिबात नाही.  

8 लाख 16 हजार 53 जनावरे
तालुक्यात संकरीत गाय 64 हजार 381 संकरीत बैल, 3 हजार 11 देशी गाय, 33 हजार 638 देशी बैल, 15 हजार 542 म्हशी, 58 हजार 641 रेड,े 4 हजार 342 शेळ्या, 1 लाख 19 हजार 697 मेढ्या, 60 हजार 335 व कोंबड्या 4 लाख 56 हजार 486 अशी 8 लाख 16 हजार 53 अशी पशुधनाची संख्या आहे. परंतु, संध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी वर्ग कवडीमोल दराने आपल्या पशुधनाची विक्री करीत आहे.