Tue, Mar 26, 2019 21:56होमपेज › Solapur › पुढीलवर्षी दोन दिवसाआड पाणीपुरवठा!

पुढीलवर्षी दोन दिवसाआड पाणीपुरवठा!

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 10:30PMसोलापूर : प्रतिनिधी

विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करून आता शहरवासीयांना चारऐवजी तीन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करावा आणि  नववर्ष अर्थात एक जानेवारी 2019 पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, असे आदेश पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून पालकमंत्र्यांनी प्रशासनाची झाडाझडती घेतल्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी तूर्तास तरी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी असल्याने पालकमंत्री देशमुख यांनी शासकीय विश्रामगृहात मनपा तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. उपमहापौर शशिकला बत्तुुल, सभागृहनेते संजय कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव, आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगरअभियंता लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, उपअभियंता विजयकुमार राठोड, उस्तुरगे, चौबे, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, वैभव हत्तुरे, अजित गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. 

उजनी, औजमध्ये पुरेसा जलसाठा असताना पाणीपुरवठा दोन दिवसाआड करणे का शक्य नाही, यासह शहरासाठी किती पाणी येते, त्याचे नियोजन कसे केले जाते आदींची माहिती घेत पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. यावेळी अधिकार्‍यांनी अमृत योजनेंतर्गत व्हॉल्व्ह बदलाची कामे तसेच बत्ती गुल होत असल्यामुळे पाणीपुरठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले. 

टाकी ओव्हर फ्लो प्रकरणी चावीवाला निलंबित 

यावेळी पालकमंत्र्यांनी जुळे सोलापुरातील पाणी टाकी ओव्हर फ्लो झाल्याप्रकरणी काय कारवाई केली असे विचारले असता आयुक्‍तांनी चावीवाल्याला निलंबित केल्याचे सांगितले. वास्तविक याप्रकरणी कर्मचार्‍यावर नव्हे तर अधिकार्‍यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही कारवाई म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असा प्रकार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ही बैठक म्हणजे केवळ फार्स असल्याची टीका करीत बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांवर टीका केली. पाण्याविषयी पालकमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलाविणे अपेक्षित होते. आता विशेष सभा घ्या, अशी मागणी चंदनशिवे यांनी केली.