Wed, Apr 24, 2019 19:34होमपेज › Solapur › बसस्थानकाच्या फलाटावर पाणी; आवारात चिखल

बसस्थानकाच्या फलाटावर पाणी; आवारात चिखल

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 7:58PMपंढरपूर : प्रतिनिधी

राज्यातील सर्वात मोठे बसस्थानक असा बडेजाव मिरवणार्‍या येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात फलाटावर पाणी तर समोरच्या आवारात चिखल अशी परिस्थिती निर्माण होत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद घेऊन फिरणार्‍या एस.टी. आगार व्यवस्थापनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते आहे. 

येथील बसस्थानकात दररोज शेकडो बसेस राज्यासह शेजारील राज्यांतूनही येत असतात आणि हजारो भाविक तसेच स्थानिक प्रवासी एस.टी.ने पंढरीत येत असतात. याठिकाणी आल्यानंतर भाविकांना प्रसन्न वाटण्याऐवजी बसस्थानकात उतरल्यापासूनच समस्यांना सामोरे जावे लागते. बसस्थानकातील व्यापार्‍यांचे मोकळ्या जागेतील अतिक्रमण, बसस्थानकात खासगी वाहतूकदारांची घूसखोरी, पश्‍चिम बाजूने येणार्‍या शौचालय आणि मुतारीची दुर्गंधी, धुळीने प्रवाशी हैराण होत असतात. हे कमी असल्यामुळेच पावसाळ्यात बसस्थानकाच्या आवारात चिखलाचे साम्राज्य निर्माण झालेले असते. बसमधून उतरणार्‍या प्रवाशांता पायाचे घोटे बुडतील एवढ्या चिखलात उतरावे लागते. तर ये-जा करणार्‍या बसेसही अंगावर चिखल उडवून जात असतात. बसस्थानकाच्या आवारात ही परिस्थिती असताना फलाटावर प्रतीक्षा करीत बसलेल्या प्रवाशांना छतावरून पडणार्‍या पाण्याचाही आता त्रात होत आहे. बसस्थानकाच्या समोर असलेल्या व्यापारी संकुलाच्या वरच्या मजल्यावरील सांडपाणी, छतावरील पावसाचे पाणी गटारात जाण्याऐवजी एका पाईपमधून येऊन थेट फलाट क्र.14 आणि 15 वर तीन फुटावरच कोसळत असते. छत आणि वरील दुकानातून येणारे सांडपाणी ज्या पाईपमधून येते ती पाईप  फलाट क्र. 14 आणि 15 वर खुली सोडलेली आहे. त्यामुळे पाऊस असो किंवा नसो या दोन्ही फलाटावर पाणी वाहत असते. या पाण्यातून वाट काढत, घसरगुंडी होण्यापासून कसरत करीत प्रवाशांना ये-जा करावी लागते. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पाणी फलाटावरून वाहत असतानाही आगार व्यवस्थापनास या पाण्याला पायबंद घालावा असे वाटत नाही या बद्दल प्रवाशांतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. निष्क्रीय आगार व्यवस्थापनाविरोधात प्रवाशांतून तीव्र नाराजीही व्यक्त होत आहे.