Fri, Aug 23, 2019 14:44होमपेज › Solapur › धरणात पाणी अन् गावात आणीबाणी

धरणात पाणी अन् गावात आणीबाणी

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 8:01PMअंबाजोगाई : रवी मठपती 

अंबाजोगाई तालुक्यातील अंबलवाडी धरणातून पुस व इतर वीस खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो. अंबलवाडी धरण परिसरातील गावांसाठी पाण्याचा स्त्रोत म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सध्या दहा गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. 

या पाणीपुरवठा योजनेकडे पाच कोटी साठ लाख रुपये थकीत बाकी आहे. त्यामुळे विद्युत महावितरण कंपनीने 21 जुलै 2017 रोजी विद्युत पुरवठा खंडित केला. अंबलवाडी धरणात सध्या पुढील दोन वर्षे पाणी पुरेल एवढा पाणीसाठा आहे, परंतु पाणी उपसा करता येत नाही. परिणामी ‘धरणात पाणी अन् दहा गावात आणीबाणी’ अशी परिस्थिती हजारो गावकर्‍यांची झाली आहे. ग्रामपंचायतकडून पाणीपट्टी वसूल होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकीत असून पाणीपट्टीचा आकडा मात्र झीरो आहे. आता थकीत असलेले पाच कोटी साठ लाख रुपयांचे वीजबिल भरायचे कोठून? हा ग्रामपंचायतीसमोर हवालदिल करून सोडणारा प्रश्‍न आहे. 

अंबाजोगाई तालुक्यातील पुस गावात वीस खेड्यांना पाणीपुरवठा करणारी योजना शासनाने  सन 1996 मध्ये पूर्ण करून सन 1998 मध्ये लोकार्पण केली. 22 वर्षांपूर्वी जल प्राधिकरण अंतर्गत पाच कोटी रुपये खर्च आला होता. त्यानंतर ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत केली. पुस, तळणी, हनमंतवाडी, दत्तपूर, घाटनांदूर, आपेट गिरवली, बावणे गिरवली, साकुड, साकुड तांडा, अंबलवाडी, वरवटी आदी गावांना या योजनेतून पाणीपुरवठा होतो.तसेच जलशुध्दीकरण होऊन पाणीपुरवठा केला जातो. या योजनेचा लाभ सर्वाधिक घाटनांदूर गावास होतो, कारण येथील लोकसंख्या अधिक आहे. दहा महिन्यांपासून करोडो रूपये थकीत वीजबिलापोटी दहा गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असला तरी अजूनही एक रुपयासुद्धा भरणा करण्यात आला नाही.

गावातील आडाला, विहिरीला, हातपंपास पाणी होते, तोपर्यंत पाणीटंचाईची झळ फारशी बसली नाही. सद्यपरिस्थितीत सार्वजनिक आडाचे, विहिरीचे व हातपंपाचे पाणी आटले आहे. त्यामुळे महिला, पुरुषांसह मुलाबाळांना उन्हा- तान्हात डोक्यावरून शेतातून पाणी आणावे लागत आहे. बैलगाडीतून व सायकलला प्लॅस्टिक हंडे अडकवून पाणी आणण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील पट्टीवडगाव व नऊ गावांचीसुद्धा पाणीपुरवठा योजना 76 लाख रुपये थकीत विद्युत बिलापोटी 28 जुलै 2017 पासून बंद आहे. याठिकाणचा पाणीपुरवठा पुस वीसखेडी योजनेबरोबरच आठ दिवसांमध्ये सुरू होणार असल्याचे कळते.

Tags : Solapur, Water, Dam, Water, Emergency, Town