Sat, Mar 23, 2019 16:43होमपेज › Solapur › पंढरपूरवर पाणी कपातीचे संकट

पंढरपूरवर पाणी कपातीचे संकट

Published On: May 14 2018 11:15PM | Last Updated: May 14 2018 11:14PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर शहरास पाणीपुरवठा होत असलेल्या बंधार्‍यात अत्यल्प पाणीसाठा असल्याने उद्यापासून (बुधवार, दि. 16 पासून) शहरास एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. उजनी धरणातून भीमा नदीला पाणी कधी सोडले जाते, हे अनिश्‍चित असल्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची वेळ नगरपालिकेवर आलेली आहे. 

येथील  चंद्रभागेवरील बंधार्‍यावर पंढरपूर शहरासह सांगोला शहर आणि  80 गावांची शिरभावी नळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. त्यातच बंधार्‍यात अत्यल्प पाणीसाठा  शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने वापर करावा लागणार आहे.  उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्याशिवाय बंधार्‍याची पाणीपातळी वाढणार नाही, तसेच उजनीतून पाणी कधी सोडले जाईल, हे निश्‍चित नाही. सोलापूर शहरासाठी हिळ्ळी बंधार्‍यात अद्याप पुरेशा प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे सोलापूर मनपाकडून पाणी सोडण्याची मागणी आलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर येथील बंधार्‍यातील पाणी  जास्तीत जास्त दिवस शहरास पुरवठा  करून वापरावे लागणार आहे. त्यामुळे शहरास दि. 16 मेपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतलेला आहे. दरम्यान उद्यापासूनच अधिक मास सुरू होत असल्यामुळे येथे येणार्‍या भाविकांना अधिक प्रमाणात येणार आहेत. त्यामुळे या भाविकांकरिता अतिरिक्‍त पाणी पुरवठा करावा लागणार असल्यामुळे न.पा.ने पाणी कपात केली आहे. 

 बंधार्‍यात पाणी कमी असल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागत आहे. नगर परिषदेकडून पुरविण्यात येणारे पाणी बांधकाम, गाड्या धुणे, बागकाम व इतरत्र वापरू नये. पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून नगर परिषदेस सहकार्य करावे.

- सौ. साधना भोसले, नगराध्यक्षा, पंढरपूर नगर परिषद