Sat, Jul 20, 2019 23:23होमपेज › Solapur › दुष्काळी कलंक पुसण्यासाठी पाणी परिषद आशादायी

दुष्काळी कलंक पुसण्यासाठी पाणी परिषद आशादायी

Published On: Jun 28 2018 1:36AM | Last Updated: Jun 27 2018 8:41PMमंगळवेढा : प्रा. सचिन इंगळे

कृष्णा खोरे अंतर्गत येणार्‍या सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यातील 13 दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळण्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्ष दुष्काळी कलंक असलेल्या मंगळवेढ्याच्या भूमीत मंगळवारी संपन्न झाली तब्बल 4 तास पाणी परिषद चाललेल्या या परिषदेस सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांतील दुष्काळी13 तालुक्यांतील शेतकर्‍यांचा सहभाग ही समाधानाची बाब म्हणता येईल.

कै. नागनाथ आण्णा नायकवडी यांनी पाणी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करून कृष्णा खोरे चे पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत नेले. या यशाचे गमक संघर्ष करणारे नेतृत्वाच्या प्रामाणिक आणि  प्रबळ इच्छाशक्तीत होते स्व. मारवाडी वकील, लक्ष्मण ढोबळे, राम साळे, या माजी आमदारांनी दुष्काळी टापुला पाणी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यश मिळवू शकले नाहीत. मात्र त्यानी वाचा फोडत ठेवली आहे. आ. भारत भालके यांनी गेल्या दोन टर्म मध्ये या प्रश्‍नाला न्यायालयीन लढा केला आणि आता चित्र आशादायी दिसत आहे. मात्र लढाई अजूनही चालूच राहील यात शंका नाही.

मंगळवेढा तालुका पाणी परिषदेसाठी निवडण्यामागे सध्या चर्चेत असलेले म्हैसाळ उपसा सिंचन आणि दक्षिण भागातील 35 गावांसाठी असलेली उपसा सिंचन योजना आहे. वर्षानुवर्षे दुष्काळी वनवासाचे चटके सहन करणार्‍या या तालुक्याला या परिषदेच्या निमित्ताने बळ मिळेल यात शंका नाही. यात प्रामाणिकपणे चळवळीत राबणारे प्रा. शिवाजी काळुगे यांना श्रेय द्यावे लागेल. आता पुन्हा एकदा तालुक्याच्या पाणी प्रश्‍नाला राज्य दरबारी वाचा फुटणार आहे. ज्येष्ठ नेते आ. गणपतराव देशमुख यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येऊन लढा देण्याची गरज मांडली. तरुणांनी या चळवळीत स्वयंप्रेरणेने सहभागी व्हावे. अशी अपेक्षा पण व्यक्‍त केली.

येत्या अधिवेशनात पाणी परिषदमध्ये मंजूर केलेल्या 12 ठरावांवर चर्चा करून कृती व नियोजन करून निधी द्यावा म्हणून शासनास भाग पाडू. हा परिषदेत व्यक्त झालेला निर्धार आशादायी आहे. शिरनांदगी तलावात म्हैसाळचे पाणी आणण्यासाठी सुधारित प्रकल्प आराखडा तयार झाला आहे. यातून मंगळवेढा तालुक्यातील 12 गावांतील 6 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन 3 गावचे पाझर तलाव पाण्याने भरले जाणार आहेत. माण नदीला कालव्याचा दर्जा मिळाला पाहिजे. योजनेचा डी. एस. आर. वर्षोनुवर्षे वाढत असून या योजना महागड्या होत चालल्या आहेत. त्यासाठी शासनाने  35 गावांच्या पाणीपुरवठा योजनेला निधी देऊन कामांना गती देण्याची गरज आहे. कारण विदर्भ व मराठवाडा चा 15 वर्षाचा अनुशेष बाजूला ठेऊन 35 गावच्या उपसा सिंचन योजनेला आ. भारत भालके यांनी मंजुरी मिळवली. पश्‍चिम महाराष्ट्रतील मंजुरी मिळालेली ही पहिली योजना आहे .

मात्र शेतकर्‍यांचे सोयरसुतक नसलेले महाभाग या योजनेची चेष्टा करण्याचे काम करीत आहेत,  अशी खंत आ. भालके यांनी परिषदेत व्यक्‍त केली. लक्ष्मण ढोबळे सत्तेत असतांना पाण्यासाठी 3 वेळा मंगळवेढा बंद केला. विधानसभेत आवाज उठवला मात्र ते या योजनानां न्याय देण्यात अपयशी ठरले. आजही तालुका अन्याय झालेल्या भावनेत जगतोय. तालुक्यातील शेतकर्‍यांनी सुपीक जमिनीचा त्याग केला आहे. तालुक्याच्या हक्‍काचे पाणी मिळाले पाहिजे.  शेतीला प्राधान्यने पाणी द्या. त्यानंतर उद्योगाला द्यावे.  माढ्याला बोगद्यातून पाणी गेले. आमच्या हक्‍काचे पाणी पळवू नका असा सूर या परिषदेतून स्थानिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.   पाणी  परिषदेमध्ये 12 ठराव बहुमताने मंजूर झाले. त्यात मंगळवेढ्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन तसेच उजनी चे पाणी मंगळवेढा तालुक्याला मिळाले पाहिजे. माण नदीला कॅनॉलचा दर्जा देणे, पाण्याचे समन्यायी वाटप, 35 गावच्या उपसा सिंचन योजनेस निधी देऊन प्रकल्प लवकर पूर्ण करावा. या ठरावाला आता मूर्त स्वरुप यावे,  ही तालुकावासीयांची इच्छा आहे. जिल्ह्याचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी मंगळवेढेकरांच्या हक्‍काचे पाणी मिळालेच पाहिजे .