Sat, Jul 20, 2019 21:30होमपेज › Solapur › वगळण्यात आलेल्या गावांचा जलयुक्‍तशिवार अभियानात समावेश करा; ना. शिंदे

वगळण्यात आलेल्या गावांचा जलयुक्‍तशिवार अभियानात समावेश करा; ना. शिंदे

Published On: May 14 2018 11:15PM | Last Updated: May 14 2018 10:29PMमाळशिरस : तालुका प्रतिनिधी 

माळशिरस तालुक्यातील सन 2018- 19 साठी जलयुक्‍त शिवार मधून 28 गावांचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवले होते. परंतु 20 गावे कॅनॉल कमांडमध्ये येत असल्याने ही गावे वगळण्यात आली होती. ही बाब पंचायत समितीचे सदस्य अजय सकट व माऊली पाटील यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने मंत्री महोदयांनी संबंधित अधिकार्‍यांना  सूचना देवून गावे समाविष्ट करून घेण्याचे आदेश दिले.

नातेपुते येथे सूळ यांच्या लग्नासाठी जलसंधारण मंत्री राम शिंदे  आले होते. त्यावेळी तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य यांनी जलयुक्त शिवार अभियानातून माळशिरस तालुका वगळण्यात आला असल्याने माळशिरस तालुक्याचे फार मोठे नुकसान होणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. हा तालुका दुष्काळी परिस्थितीमुळे अगोदरच मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. तरच तालुक्यातील पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे ही गावे या योजनेत समाविष्ट करा अशी मागणी तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी केली. त्याची दखल घेत मंत्री महोदयांनी आ. आर. जी. रुपनवर यांच्या निवासस्थानी अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेऊन अधिकार्‍यांना सूचना केल्या. 

माळशिरस तालुक्यातील जी गावे या अगोदर जलयुक्त शिवारमध्ये घेण्यात आली होती. ती सोडून सर्व गावे घ्यावीत अशा सूचना जलसंधारण मंत्री शिंदे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी बोलताना ना, शिंदे म्हणाले  की राज्यातील 25 हजार गावे जलयुक्त करायची आहेत. त्यासाठी लोकसहभागातून व शासकीय निधीचा वापर करून राज्य जलपूर्ण करायचे आहे. ग्रास कमांड एरियात येणार्‍या सर्व गावात तसेच ज्या गावात कॅनॉल पाणी मिळत नाही अशा गावाचे पाणलोट करण्याच्या सूचना दिल्या. ही गावे पूर्ण निवडण्याचे आदेश दिले. यावेळी आ. रुपनवर  यांनी  जलयुक्त अभियान अंतर्गत बागायती गावामध्ये लोकसहभागातून विहीर पुनर्भरण, बोअर पुनर्भरण, ओढा खोलीकरण,  नाला खोलीकरण केल्यानंतर बंधारे देण्यात यावे मागणी केली.

या बैठकीला आ. रुपनवर, उत्तमराव जानकर, माजी सभापती मच्छिंद्र  ठवरे, अ‍ॅड. सोमनाथ वाघमोडे, नातेपुतेचे सरपंच बी. वाय. राऊत, पं. स. अजय सकट, माऊली पाटील, महेश सोरटे, पांडुरंग वाघमोडे, सुधीर काळे, बाळासाहेब सरगर, दादा उराडे, भैय्या चांगण, संदीप ठोंबरे तहसीलदार बाई माने, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, जलसंधारण उपअभियंता रावसाहेब इंगोले, मंडल कृषी अधिकारी सतिश कचरे, तलाठी सचिन पाटील,  रमेश पाटील उपस्थित होते.

पंचायत समिती सदस्य अजय सकट यांनी माळशिरस तालुक्यात कमांडमुळे जलयुक्‍त शिवार योजनेसाठी अनेक गावे वगळण्यात आले असल्याचे  सांगताच तातडीने तहसीलदार बाई माने, कृषी अधिकारी मुळे यांना बोलावण्यात आले. बैठकीत त्यांना अनेक प्रश्‍न विचारताच अधिकार्‍यांना समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याने  शासनाचे जीआर पहा व कामे करा असे ना. शिंदे यांनी सांगितले.