होमपेज › Solapur › वॉटर कप स्पर्धेच्या श्रमदानाला आता शासनाच्या मदतीचा हात

वॉटर कप स्पर्धेच्या श्रमदानाला आता शासनाच्या मदतीचा हात

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 8:24PMसोलापूर : महेश पांढरे

सत्यमेव जयते वॉटर स्पर्धेअंतर्गत गावातील लोकांनी श्रमदान करुन गावातील जलसंधारणाची कामे करावीत तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा गावांना बक्षीस देण्याची योजना अभिनेते अमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनने राबविली आहे. त्या योजनेला आता शासनानेही हातभार लावला आहे. त्यामुळे ज्या गावात लोकसहभाग मोठा आहे अशा गावात आता यंत्रावर कामे करण्यासाठी शासनाने दीड लाख रुपयांचे अनुदान यंत्राच्या मशिनसाठी देण्याचे नियोजन केले आहे.

सध्या जिल्ह्यातील दोनशे ते अडीचशे गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून अनेक गावांत श्रमदानातून कामे सुरु आहेत. मात्र सर्वच कामे श्रमदानातून आणि माणसांवर होणे शक्य नाही. अशी मोठमोठी जलसंधारणाची कामे करण्यासाठी आता शासनाने डिझेलसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी अनेक गावांनी केली होती. त्याची दखल घेऊन त्याचा आदेश जारी केला असून ज्या गावांनी श्रमदान मोठ्या प्रमाणात केले आहे अशा गावांना इंधनासाठी दीड लाख रुपयांचे अनुदान देण्याचे मान्य केले आहे.

यासाठी भारतीय जैन संघटनेच्यावतीने मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणी फाऊंडेशनच्या कामांना आता खर्‍याअर्थाने गती येणार असून अनेक गावे आता पाणीदार होणार आहेत. ज्या ज्या गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे व ज्या ज्याठिकाणी श्रमदानातून मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे अशा गावांत आता मशिनवर काम करण्यासाठी इंधन अनुदान मागणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Tags : solapur, solapur news, Water Cup Competition, government help,