Mon, May 20, 2019 10:08होमपेज › Solapur › वॉचमनने केली बनावट चावीद्वारे तीन घरफोड्या 

वॉचमनने केली बनावट चावीद्वारे तीन घरफोड्या 

Published On: Jun 21 2018 1:18AM | Last Updated: Jun 20 2018 10:39PMसोलापूर ः प्रतिनिधी 

विश्‍वासाने ठेवलेल्या वॉचमनने बनावट चावीद्वारे तीन घरांवर डल्ला मारुन तब्बल 7 लाख 78 हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. यात पोलिसांनी चक्रे फिरवून चोवीस तासात आरोपीस अटक करुन न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती जेलरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.मोहम्मद गफूर शेख (वय 36, रा. अंबाबाई मंदिराजवळ, रामवाडी) असे पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घरफोडी मुस्लिम पाच्छा पेठ येथील जिंदशामदार चौकातील लिमरास शॉईन प्लाझा कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावरील घरातून चोरी झाली.

हा चोरीचा प्रकार 13 ते 17 जून रोजीच्या कालावधी घडला. याबाबत जुबेर अब्दुल रशिद खलिफा (वय 35) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात वॉचमनविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. जुबेर अब्दुल रशिद खलिफा यांच्या राहत्या घरातून 15 तोळे सोने, एक लाखाची रोख रक्‍कम, आरिफ अ गनी मर्चंट यांच्या राहत्या घरातून 1 तोळे सोने व एक लाख 38 हजार रोख रक्‍कम आणि फारूक मलंग मैंदर्गी यांच्या राहत्या घरातून रोख रक्‍कम 60 हजार असे एकूण 7 लाख 78 हजारांचा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या कॉम्प्लेक्समध्ये एकूण आठ प्लॅटस आहेत. या कॉम्प्लेक्सच्या संरक्षणासाठी फिर्यादीचे भाऊ समीर अब्दुला रशिद खलिफा यांनी  मोहम्मद शेख या वॉचमनला ठेवले होते.

मागील चार वर्षांपासून हा वॉचमन संरक्षण करीत आहे. 13 ते 16 जून दरम्यानच्या कालावधीत रमजान ईद सणानिमित्त घरातील सर्वजण मधला मारुती येथील नातेवाईकांकडे सण साजरा करण्यासाठी गेले होते. ही संधी साधून वॉचमनने बनावट चावीद्वारे घरात प्रवेश करून घरातील ऐवज चोरून नेले. 17 जून रोजी घरी परतल्यानंतर घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे पाहून चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याचदिवशी वॉचमन हा पार्किंगमध्ये असलेल्या लिप्टच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्हीचे संपूर्ण सॉकेटला आग लावून पुरावे नष्ट करताना आढळून आला. फिर्यादीस पाहून त्याने तेथून पळ काढला. त्यामुळे संशयावरुन वॉचमनविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.