Sat, Mar 23, 2019 00:30होमपेज › Solapur › आषाढीत वारकर्‍यांना प्लास्टिक कागद वापरण्याची मुभा

आषाढीत वारकर्‍यांना प्लास्टिक कागद वापरण्याची मुभा

Published On: Jul 05 2018 1:42AM | Last Updated: Jul 04 2018 8:38PMअकलूज : वार्ताहर

राज्यात प्लास्टिकच्या वापरावर  बंदी असली तरी वारकर्‍यांना  पावसापासून संरक्षणासाठी प्लास्टिक कागद वापराला परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य. अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे वारकरी, फडकरी, दिंडी समाजाचे अध्यक्ष व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर  यांनी स्वागत केले असून प्रश्‍न मार्गी लागल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व श्रीकांत भारतीय यांना धन्यवाद दिले आहेत. शासनाने नुकतीच प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकचा अंतर्भाव असलेल्या वस्तूंची निर्मिती, वाहतूक व वापराला बंदी घातली आहे. 

वारीत चालणारे वारकरी पावसापासून संरक्षणासाठी वर्षानुवर्षे प्लास्टिक कागदाचा वापर करतात. वारकर्‍यांच्यादृष्टीने हा कागद बहुगुणी व बहुपयोगी आहे.  विश्रांतीच्या वेळेस ओल्या जमिनीवर खाली टाकून बसायला,  झोपायला तो खूप सोयीचा ठरतो. जोराचा पाऊस सुरू झाला तर हाच कागद तंबूच्या ताडपत्रीवर टाकता येतो. चिखलाने भरला तर स्वच्छ करायला विशेष  त्रास होत नाही. त्यामुळे वारीदरम्यान वारकर्‍यांना हा प्लास्टिक कागद शासनाने उपलब्ध करून द्यावा व  त्याच्या वापराला परवानगी द्यावी, ही वारकर्‍यांची भावना होती. 

पावसात भिजू नये यासाठी प्लास्टिक कागद वापरला तर आपल्यावर दंडाची कारवाई होईल, अशी त्यांना भीती वारकर्‍यांच्या मनात होती. यानिमित्ताने वारी, वारकरी, पाऊस आणि प्लास्टिक कागदाचा वापर हा विषय चर्चेत आला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन वारकर्‍यांना प्लास्टिक कागदाच्या वापराला शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर यांनी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री  कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. श्रीकांत भारतीय यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनाला ही बाब आणून दिली. मुख्यमंत्री व श्रीकांत भारतीय यांची या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर वारकर्‍यांना  पावसात  प्लास्टिक कागद वापरता येईल. विठूरायाच्या ओढीने पंढरीकडे निघालेल्या वारकर्‍यांवर  कसलीही कारवाई होणार नाही, ही भूमिका मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केली आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी यात्रेसाठी येणार्‍या वारकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.