Sat, Aug 17, 2019 17:11होमपेज › Solapur › हॉटनेट प्रणालीमधील शेतकरी प्रतिक्षाधिन यादीच्याच प्रतीक्षेत

हॉटनेट प्रणालीमधील शेतकरी प्रतिक्षाधिन यादीच्याच प्रतीक्षेत

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 23 2018 12:54AMमाढा : तालुका प्रतिनिधी

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत हॉटनेट प्रणालीमधील शेतकर्‍यांच्या अर्जाची सोडत होऊन तीन आठवड्यानंतरही प्रतिक्षाधिन यादी प्रसिद्ध न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यासंबंधीचा चालू वर्षीचा लक्ष्यांक अप्राप्त असल्याने प्रशासकीय स्तरावरही यादी प्रसिध्दीबाबत अनिश्‍चितता असल्याचे सांगितले जात आहे.

या अभियानांतर्गत ट्रॅक्टर, कांदाचाळ, पॅक हाऊस, शेततळे अस्तरीकरण, पॉवर टीलर 8 एचपीपेक्षा  कमी  व जास्त,  ट्रॅक्टरचलित अवजारे, स्वयंचलित अवजारे, पीक संरक्षण उपकरणे, पॉलिहाऊस, मधुमक्षिका पालन, लागवड साहित्य, जुन्या बागांचे पुनर्जीवन, घन लागवड, फुलशेती, शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग, बेदाणा शेड, आळिंबी उत्पादन, काजू प्रक्रिया युनिट, कोल्ड स्टोरेज युनिट, रापिनींग चेंबर, पॅकहाऊस, सामूहिक  शेततळे या घटकांचा यामध्ये समावेश आहे. 

या योजनेसाठी जिल्ह्यातून साधारणपणे एकवीस हजार शेतकर्‍यांचे, तर माढा तालुक्यातून 2183 शेतकर्‍यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले होते. यासाठीची लाभार्थ्यांची सोडत 30 जुलै रोजी काढण्यात आली होती. जिल्ह्यासाठी लक्ष्यांकाची प्राप्ती नसतानाही ही सोडत काढली गेली होती. वेळेची बचत होण्यासाठी लक्ष्यांक अप्राप्त असताना प्रशासनाने ही सोडत घेतली होती. सोडत झाल्यानंतर लागलीच प्रतिक्षाधिन यादी प्रसिद्ध करावयास हवी होती. परंतु तीन आठवड्यानंतरही ही यादी प्रसिद्ध न केल्याने याबाबत आता शेतकर्‍यांतून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. सोडत काढताना आम्हाला कसलीही कल्पना दिली गेली नसल्याचा तोंडी आक्षेपही काही  शेतकर्‍यांनी प्रशासनाकडे नोंदवला. आता किमान प्रतिक्षाधिन यादी प्रसिद्ध करुन याबाबतीत पारदर्शकता जपण्याचा आशावाद शेतकरीवर्गातून व्यक्त केला जात आहे.

यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लक्ष्यांक अप्राप्त आहे. सोडतीप्रमाणे प्रतिक्षाधिन यादी दोन दिवसांत प्रसिद्ध करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जातील.