Sun, May 26, 2019 21:28होमपेज › Solapur › सोलापूर : किरकोळ कारणावरुन वेटरकडून सहकाऱ्याचा खून

सोलापूरात वेटरची निर्घृण हत्या

Published On: Apr 26 2018 5:16PM | Last Updated: Apr 26 2018 5:30PMमोहोळ (सोलापूर): प्रतिनिधी

जेवणाच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या वादाच्या रागातून एका वेटरने सहकाऱ्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  महेंद्र सोपान बनसोडे (वय 40 वर्षे रा. वडवळ ता. मोहोळ) असे खुन झालेल्या वेटरचे नाव आहे. बुधवारी रात्री पावणे अकराच्या  सोलापूर-पुणे महामार्गावर वडवळ पाटी नजीक असणार्‍या हॉटेल सदिच्छा येथे ही घटना घडली. या प्रकरणी मोहोळ पोलीसात खून करणार्‍या वेटरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या घटनेमुळे वडवळसह संपुर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मोहोळ पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर-पुणे महामार्गावर वडवळ पाटीच्या नजीक सचिन फाटे यांचे सदिच्छा हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये सुभाष शहाजी पाटील हे मॅनेंजर असून महेंद्र सोपान बनसोडे रा. वडवळ, भाऊसाहेब उत्तम आवारे रा. रेल्वे स्टेशन मोहोळ, ऋषीकेश रणदिवे आणि नवनाथ माने हे सर्वजण वेटर म्हणून काम करतात.

बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास हॉटेल बंद करताना महेंद्र बनसोडे आणि भाऊसाहेब आवारे या दोघांचे जेवणाच्या कारणावरुन भांडण झाले होते. त्यामुळे चिडलेल्या भाऊसाहेब आवारे या वेटरने हॉटेल सदिच्छाच्या किचनरुमच्या पाठीमागे असणार्‍या पाण्याच्या टाकीजवळ एका अवजड हत्याराने महेंद्र बनसोडे यांच्या डोक्यात आणि तोंडावर वार केले. त्यामुळे महेंद्र बनसोडे हा गंभीर जखमी होऊन जागेवरच कोसळला. त्यामुळे हॉटेलचे मालक सचिन फाटे यांनी तात्काळ नवनाथ माने या वेटरच्या मार्फत महेंद्र बनसोडे याचा भाऊ शरद बनसोडे यांना घटनास्थळी बोलवून घेतले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महेंद्र बनसोडे यास उपचारासाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यु झाला असल्याचे डॉक्टरांकनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवुन पाहणी केली. त्यानंतर सोलापूर ग्रमीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह डोंगरे यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. यावेळी पोलीसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.

याबाबत मयत महेंद्र याचा भाऊ शरद बनसोडे यांनी मोहोळ पोलीसात दिलेल्या फिर्यादी नुसार, भाऊसाहेब उत्तम आवारे रा. रेल्वे स्टेशन मोहोळ या वेटरच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक एस.विरेश प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सोलापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह डोंगरे हे करीत आहेत. या घटनेमुळे मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी आरोपीस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याने नेमक्या कोणत्या कारणाने व कोणाच्या सांगण्यावरुन महेंद्र बनसोडे याचा खुन केला  हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉक्टरांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच त्याचा खुन कसा झाला हे समजणार आहे. हा खून करताना भाऊसाहेब आवारे यास कोणी सहाकार्य केले आहे का? जेवणाच्या कारणावरुन हा खुन झाला आहे का? अन्य कोणते कारण आहे? यांसारखे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या खुनाचा तपास करण्याचे कठीण आव्हान तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह डोंगरे यांच्या समोर आहे.

Tags : Waiter, Murder, Solapur, Crime News,  Mohal Hotel