Sun, Mar 24, 2019 23:02
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाकडून ‘वाडिया’ची पाहणी 

धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाकडून ‘वाडिया’ची पाहणी 

Published On: Jul 26 2018 1:40AM | Last Updated: Jul 25 2018 10:03PMसोलापूर : प्रतिनिधी  

एकेकाळी सोलापूरची शान असलेले आणि गरजू गरीब रुग्णांच्या सेवेत चोवीस तास सुरु असणारे, परंतु गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेले वाडिया  चॅरिटेबल हॉस्पिटल पुन्हा एकदा सोलापूरकरांच्या सेवेत रुजू होण्याच्या तयारीत आहे. बुधवार, 25 जुलै रोजी धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाच्या कर्मचार्‍यांसह हॉस्पिटलच्या ट्रस्टी मंडळींनी पाहणी केली. यावेळी ट्रस्टी मंडळाचे प्रभाकर करंदीकर यांच्यासह शिरीष गोडबोले, अनिल भागवत, हेमंत चौधरी, अनिल बर्वे हे ट्रस्टी संचालक उपस्थित होते.

सन 1934 मध्ये संस्थापक डॉ.  विष्णू गणेश वैशंपायन यांनी सुरु केलेले वाडिया हॉस्पिटल 2010 सालापर्यंत सुरु होते. नोव्हेंबर 2010 मध्ये शेवटच्या रुग्णाची हॉस्पिटलच्या रजिस्टरला नोंद झालेले रेकॉर्ड असल्याचे ट्रस्टींनी सांगितले.सोलापूरच्या रुग्णसेवेत अग्रमान्य असलेल्या वाडिया हॉस्पिटलची सध्याची स्थिती खूपच दयनीय झालेली आहे. हॉस्पिटलच्या परिसरात सर्वत्र झाडीझुडुपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. इमारतींचीही देखभाल झालेली नाही. धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाकडून ट्रस्टींना यापूर्वीच ताबा देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.  बुधवारी सर्वांनी मिळून हॉस्पिटल परिसराची पाहणी केली. हॉस्पिटलच्या एकूण मालमत्तेची पाहणी करुन माहिती घेतली.वाडिया हॉस्पिटल लवकरच रुग्णसेेवेत दाखल होणार आहे. तत्पूर्वी ट्रस्टी मंडळाकडून खर्चाचा अंदाज घेण्याचे काम सुरु आहे. हॉस्पिटल 2010 साली बंद झाले असल्याने त्यापूर्वीची आणि आजपर्यंतची देणी काय आहेत. महापालिकेसह विविध शासकीय  कार्यालयांना हॉस्पिटलकडून काही देणे लागते का आणि त्याची आकडेवारीत रक्‍कम किती याची माहिती ट्रस्टी घेत आहेत. 

हॉस्पिटलची मालमत्ता किती आणि कशा स्थितीत आहे. कागदोपत्री असलेली मालमत्ता सध्या अस्तित्वात आहे की नाही, याचीदेखील ट्रस्टी माहिती घेत आहेत.  या पाहणीवेळी  धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाचे निरीक्षक शिवाजी शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी अधिकारी तसेच डॉ. विजय सावस्कर आदी उपस्थित होते.