Sun, May 26, 2019 18:41होमपेज › Solapur › करमाळा बाजार समितीच्या 15 जागांसाठी आज मतदान

करमाळा बाजार समितीच्या 15 जागांसाठी आज मतदान

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 08 2018 10:54PMकरमाळा : प्रतिनिधी

करमाळा कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या 15 संचालकपदांच्या जागांसाठी रविवार, 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत 139 बूथवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांनी निर्भयपणे व खुल्या वातावरणात आपला मतदानाचा हक्‍क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मारुती बोरकर यांनी केले आहे.

करमाळा कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या संचालकपदाच्या 15 जागांसाठी होत असलेल्या  मतदानामध्ये करमाळा तालुक्यातील 118 गावांतून ही मतदान प्रक्रिया पार पडत असून, त्यासाठी 139 बूथ तयार करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी 695 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. 14 अतिरिक्‍त झोनल अधिकारी, त्याचबरोबर 70 अतिरिक्‍त कर्मचारी, 16 क्षेत्रीय अतिरिक्‍त  अधिकार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे मतदारांना निर्भयपणे आपला मतदानाचा हक्‍क बजावता येणार असल्याचे स्पष्ट करून मारूती बोरकर म्हणाले की, या सर्वच मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात येणार आहे.

सकाळी 8 ते 5 यावेळेमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर करमाळा तहसील कार्यालयामध्ये सर्व मतपत्रिका एकत्रित स्ट्राँगरूममध्ये ठेवल्या जाणार आहेत. 11 सप्टेंबर रोजी करमाळा तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या हॉलमध्ये मतमोजणी होईल. दुपारी 4 पर्यंत सर्व गणांतील निकाल जाहीर करण्याच्यादृष्टीने आमचा प्रयत्न राहणार असल्याचे बोरकर म्हणाले. यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बेल्हेकर, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गावडे उपस्थित होते.