Mon, May 27, 2019 01:25होमपेज › Solapur › करमाळा, माढा, बार्शी, मोहोळमध्ये मतदार वाढले

करमाळा, माढा, बार्शी, मोहोळमध्ये मतदार वाढले

Published On: Sep 02 2018 1:18AM | Last Updated: Sep 01 2018 9:15PMसोलापूर : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारुप मतदार यादी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांत 32 लाख 26 हजार 683 मतदारांचा या यादीत समावेश करण्यात आला. 

या यादीत नव्याने 57 हजार 216 मतदार वाढले आहेत. प्रस्तावित मतदार पुनर्रीक्षण कार्यक्रमानुसार 4 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. साधारणत: मार्च 2019 नंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल यादृष्टिकोनातून हा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे. परंतु डिसेंबरपूर्वीच आचारसंहिता लागू झाली तर शनिवार, 1 सप्टेंबर रोजी जाहीर झालेली प्रारुप मतदार यादी अंतिम मतदार यादी समजली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा पुनर्रीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 10 जानेवारी 2018 ते 31 ऑगस्ट 2018 याकालावधीत मोहीम राबविण्यात आली होती. पुनर्रीक्षण यादीवर दावे, हरकती असल्यास 31 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा निवडणूक कार्यालय आणि तहसील कार्यालयांमध्ये दाखल करावेत. ज्यांची नावनोंदणी झालेली नाही त्यांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. 10 जानेवारी रोजी झालेल्या मतदार यादीत 32 लाख 26 हजार 683 मतदारांचा समावेश होता. या यादीची पुन्हा छाननी करण्यात आली. यात पुन्हा 19 हजार 69 मतदारांची वाढ झाली, तर 29 हजार 643 नावे विविध कारणांनी वगळण्यात आली. 1 लाख 7 हजार 69 मतदारांबाबत विविध प्रकारच्या दुरुस्त्या करण्यात आल्या. नव्या मतदार यादीत 16 लाख 95 हजार 724  पुरुष मतदारांचा, तर 15 लाख 30 हजार 909 स्त्री मतदारांचा समावेश आहे. 50 तृतीयपंथी मतदारांचाही समावेश आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात 2 लाख 73 हजार 591 मतदार होते, तर नव्या यादीत ही संख्या 2 लाख 72 हजार 706 वर पोहोचली आहे. येथेही 885 मतदार घटले आहेत. शहर उत्तरमध्ये 2 लाख 69 हजार 916 मतदार होते आता 2 लाख 63 हजार 35 मतदारांचा समावेश आहे. करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ या मतदारसंघांतील मतदार संख्या वाढली आहे. 31 जुलै 2014 मध्ये जाहीर झालेल्या मतदार यादीनुसार अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात 3 लाख 28 हजार 206 मतदार होते, तर नव्या यादीत 3 लाख 23 हजार 23 मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात 4 हजार 975 मतदारांची घट झाली आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात 2 लाख 90 हजार 452 मतदार होते. 1 जानेवारी 2019 रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 1 जानेवारी 2001 वा त्यापूर्वीची आहे व जो सामान्य रहिवासी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहणार आहे.

मतदार यादी पुनर्रीक्षण कार्यक्रम
- प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध  : शनिवार, 1 सप्टेंबर 2018,  दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी : शनिवार, 1 सप्टेंबर ते बुधवार, 31 ऑक्टोबर 2018,  दावे व हरकती निकालात काढणे : शुक्रवार, 30 नाव्हेंबर 2018 पूर्वी. डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई : गुरुवार, 3 जानेवारी 2019 पूर्वी. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : शुक्रवार, 4 जानेवारी 2019.