Mon, May 20, 2019 20:07होमपेज › Solapur › विठ्ठलराव शिंदे कारखाना संपूर्ण उसाचे गाळप करणार : आ. शिंदे

विठ्ठलराव शिंदे कारखाना संपूर्ण उसाचे गाळप करणार : आ. शिंदे

Published On: Feb 11 2018 10:41PM | Last Updated: Feb 11 2018 10:28PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

 विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करणार असून शेतकरी सभासदांनी नोंदविलेला ऊस इतरत्र न देता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आ. बबनराव शिंदे म्हणाले की, यंदा ऊस मुबलक होता. तरीही गाळपाचे योग्य नियोजन केल्याने ऊस गाळप आटोक्यात आले असून विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडे नोंद केलेल्या संपूर्ण  उसाचे कारखाना गाळप करणार आहे. यामुळे कार्यक्षेत्रातील सर्व सभासद शेतकर्‍यांनी बाहेरच्या कारखान्यास देऊ नये अथवा ऊस गाळीताची अजिबात काळजी करू नये, असे म्हटले आहे. कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करूनच कारखाना बंद होईल.

विठ्ठलराव शिंदे कारखान्याने गळीतास आलेल्या सर्व उसाचे जानेवारी अखेरपर्यंतचे पेमेंट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे तसेच सर्व कामगारांचे दरमहा वेळेवर पेमेंट दिले जात असून कामगारांच्या वेतन वाढीतील 16 टक्के फरकाची रक्कम एकरकमी कामगारांच्या बँक खात्यावर जमा केली आहे.

14 दिवसांच्या आत शेतकर्‍यांचे सर्व पेमेंट देणारा, तोडणी व वाहतूकदारांची नियमित देणी देणारा व कामगारांना दरमहा वेळेवर वेतन देणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना हा जिल्ह्यातील एकमेव कारखाना असून राज्यातील काही मोजक्या कारखान्यांपैकी एक कारखाना असल्याचेही आ. बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

तसेच कार्यक्षेत्रातील सभासदांच्या व बिगर सभासदांच्या संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही असे ठामपणे सांगून सर्व ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही शेवटी आ. बबनराव शिंदे यांनी केले.

या पत्रकार परिषदेस कारखान्याचे संचालक बबनराव पाटील, प्रभाकर कुटे, रमेश येवले-पाटील, शिवाजी डोके, लक्ष्मण खुपसे, वेताळा जाधव, कार्यकारी संचालक आर.एस. रणवरे, सचिव सुहास यादव, चीफ अकाऊटंट बी. एन. जगदाळे, वर्क्स मॅनेजर सी.एस. भोगडे, मुख्य रसायनी पी. एस. येलपले, मुख्य शेती अधिकारी एस. पी. थिटे, मुख्य ऊस विकास अधिकारी एम. आर. भादुले, डिस्टिलरी मॅनेजर पी. व्ही. बागल, शेती अधिकारी एस.एस. बंडगर आदी उपस्थित होते.