Thu, Feb 21, 2019 09:45होमपेज › Solapur › विठ्ठल दर्शन काळाबाजार : मंदिर समिती सदस्य ताब्यात

विठ्ठल दर्शन काळाबाजार : मंदिर समिती सदस्य ताब्यात

Published On: Sep 01 2018 8:13PM | Last Updated: Sep 01 2018 8:13PMपंढरपूर : प्रतिनिधी

विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन झटपट घडवून आणण्यासाठी खासगी व्यक्तींच्यामार्फत पैसे घेऊन काळा बाजार केल्याप्रकरणी मंदिर समितीच्या सदस्यास पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. सचिन अधटराव असे या सदस्याचे नाव आहे. पंढरपूर पोलिसांची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.  दरम्यान या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

विठ्ठल रूक्मिणीचे थेट दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखवून २ भाविकांना दर्शन पास  देण्यासाठी त्यांच्याकडून रोख ८०० रूपये घेऊन भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मंदिर परिसरातील प्रसाद विक्री करणार्‍या विजय देवमारे, कैलास डोके या दोघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीनिवासराव प्रसादराव पीठे व त्यांची पत्नी लक्ष्मी हैद्राबाद येथून गुरूवार ( दि. ३० ऑगस्ट) रोजी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी श्रीनिवासराव पीठे  यांच्याकडून मंदिराजवळ प्रसाद विकणार्‍या कैलास डोके आणि विजय देवमारे यांनी त्यांना विठ्ठलाचे तात्काळ दर्शन मिळवून देण्याचे अमिष दाखवत त्यांच्याकडून ८०० रूपये घेतले. पीठे यांच्या आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी शहर पोलिसात संबंधिताविरूध्द तक्रार दिली होती. 

या प्रकरणी पोलिसांनी संबंधित संशयितांना अटक केल्यानंतर अधिक चौकशी केली असता या दर्शन काळा बाजार प्रकरणाचा सुत्रधार मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी आज, शनिवारी सायंकाळच्या सुमारास अधटराव यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान दर्शन काळाबाजार प्रकरणी पहिल्यांदाच मंदिर समिती सदस्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे विठ्ठल दर्शनाचा काळाबाजार उघडकीस आला आहे.