Fri, Sep 21, 2018 09:28



होमपेज › Solapur › सोलापूर : माजी महापौरांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा

सोलापूर : माजी महापौरांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा

Published On: Feb 14 2018 12:32PM | Last Updated: Feb 14 2018 12:32PM



सोलापूर : प्रतिनिधी

बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करुन जागेची परस्पर विक्रि करुन फसवणुक केल्याप्रकरणी माजी महापौरांसह तिघांविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल करबसू जाधव (वय 62, रा. घर नं. 3, भैरू वस्ती, लिमयेवाडी, सोलापूर), यल्लप्पा काशिनाथ जाधव (वय 34), संतोष काशिनाथ जाधव (वय 27, दोघे रा. शहा नगर, भटक्या विमुक्त झोपडपट्टी, वांगी रोड, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सचिन लक्ष्मण तळभंडारे (वय 39, रा. भैरु नगर, न्यु आरटीओ रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सचिन तळभंडारे यास वारसा हक्काने मिळालेली व तळभंडारेच्या मालकीची उत्तर सोलापूर तालुक्यातील गट नं. 30 मधील 1 हेक्टर 63 आर या जागेचे  विठ्ठल जाधव यांनी बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करुन घेतले. वास्तविक हे कुलमुखत्यारपत्र देणारे पांडुरंग भगवान तळभंडारे व मल्लिकार्जुन भैरु तळभंडारे हे कुलमुखत्यारपत्र देण्यापूर्वीच मयत झालेले असताना त्यांना हयात दाखवून व   खरेदीच्यावेळी  हजर दाखवून बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर विठ्ठल जाधव यांनी यल्लप्पा जाधव व संतोष जाधव यांच्याशी संगनमत करुन 17 ऑगस्ट 2017 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात जागेची परस्पर विक्रि करुन फसवणुक केली. म्हणून जाधव यांच्यासह तिघांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याबाबत तळभंडारे यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रारी अर्ज केला होता. त्या  अर्जाची चौकशी होऊन अखेर सदर बझार पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक कजागवाले तपास करीत आहेत.