Fri, Apr 26, 2019 01:39होमपेज › Solapur › रविवारपासून विठ्ठल दर्शन 24 तास

रविवारपासून विठ्ठल दर्शन 24 तास

Published On: Jul 12 2018 1:44AM | Last Updated: Jul 11 2018 10:42PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रेसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल दर्शन मिळावे म्हणून रविवार, दि.15 जुलैपासून मंदिर समितीने 24 तास दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन चालणार असून 18 जुलैपासून ऑनलाईन बुकिंग दर्शन सेवा बंद केली जाणार आहे. 

दरम्यान, मंदिर समितीची बहुप्रतीक्षित टोकन दर्शन सुविधा आषाढी यात्रेवेळी सुरू होणार असून यात्रेच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औपचारिक शुभारंभ करून यात्रेनंतरच ही सुविधा अंमलात आणली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

आषाढी एकादशीचा सोहळा 23 जुलै रोजी साजरा होत असून त्यासाठी राज्याभरातून पालख्यांचे प्रस्थान पंढरीच्या दिशेने झाले आहे. पालखी सोहळ्यापूर्वीच पंढरीत भाविकांची गर्दी होत असते. येथे आलेल्या सर्वच भाविकांना विठ्ठलाचे दर्शन व्हावे या हेतूने मंदिर समिती यात्रेच्या काळात 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध करून देत असते.  त्यानुसार येत्या रविवार दि. 15 पासून श्री. विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू करण्यात येणार आहे. 27 जुलै रोजी आषाढ शुद्ध पोर्णिमेला यात्रा समाप्त होत असली तरी प्राक्षाळ पूजेपर्यंत (1 ऑगस्ट) पर्यंत विठ्ठलाचे दर्शन 24 तास सुरू ठेवणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. सध्या सुरू असलेले विठ्ठलाचे ऑनलाईन बुकींग दर्शन मात्र 17 जुलैपासून पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. 28 जुलैपर्यंत ऑनलाईन दर्शन बुकींग सेवा बंद राहणार आहे अशीही माहिती पुदलवाड यांनी दिली. 

दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत असलेली मंदिर समितीची टोकन दर्शन सुविधा मात्र आषाढी यात्रेवेळी चालू होणार नाही. तांत्रिक बाबींची पुर्तता झाली नसल्यामुळे ही सुविधा आषाढी यात्रेनंतर सुरू केली जाईल असे दिसून येते. मात्र शासकीय महापूजेसाठी येणार्‍या मुख्यमंत्र्यांच्याहस्ते टोकन दर्शन सुविधेचा  औपचारिकरित्या शुभारंभ केला जाण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.