Tue, May 21, 2019 04:29होमपेज › Solapur › नांगरे-पाटील यांनी जाणून घेतल्या जनतेच्या अडचणी

नांगरे-पाटील यांनी जाणून घेतल्या जनतेच्या अडचणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

होटगी : प्रतिनिधी

जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने आयोजित ग्रामसुरक्षा दल आणि पोलिस पाटील मार्गदर्शन कार्यक्रमात कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी उपस्थित जनतेशी थेट संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या.

यावेळी कर्देहळ्ळी येथील नागरिक पवार यांनी अवैधधंदे, गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी जनतेला पोलिसांकडून संरक्षण मिळण्याची अपेक्षा व्यक्‍त केली. होटगी येथील अभिजित ढोले याने आपल्यावर हल्ला होऊन सहा महिने उलटले तरी हल्लेखोरांना अटक होत नसल्याचे सांगितले. नागरिकांनी वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये अवैध धंदे बंद करण्याची विनंती केली. 

नांगरे-पाटील यांनी प्रत्येक गावांतील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ग्रामसुरक्षा दल आणि महिला दारूबंदी पथक नेमण्यात आले असून अवैध धंदेवाल्यांवर कठोर कारवाईसाठी जागरूक नागरिकांची आवश्यकता आहे. त्यांना विशेष अधिकार देणार असल्याचे सांगितले. वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे यांच्या कार्यकालात विडी घरकूल परिसरातील जातीय दंगली नियंत्रणात आणल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस ठाण्याबरोबरच पोलिस आणि नागरिक यांच्यातील संबंधदेखील स्मार्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी तक्रारी उपस्थित करणार्‍यांची दखल घेतली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करणार असल्याची ग्वाही दिली. नागरिकांमध्ये जागरुकता वाढत असून मिरवणुकीतील डॉल्बीच्या पैशातून, गावात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणे, जलसंधारणाची कामे करणे असे विधायक कार्यक्रम हाती घेत आहेत, तर वळसंग ग्रामस्थांनी देखील असा एखादा उपक्रम राबवून वळसंग गावात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले. 

याप्रसंगी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलिस उपधीक्षक प्रितम यावलकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे, पोलिस निरीक्षक विकास अडसुळ यांच्यासह वळसंगचे सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसुरक्षा दलाचे कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

पोलिस पाटील यांना रायफल परवाने देणार : नांगरे-पाटील

पोलिस पाटलांना रायफल घेण्यासाठी परवाने देणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने वळसंगवाडा येथे आयोजित ग्रामसुरक्षा दल आणि पोलिस पाटील मार्गदर्शन कार्यक्रमात सांगितले. 

पोलिस पाटील धायगुडे यांनी स्वसंरक्षणार्थ पिस्तूल परवाना देण्याची मागणी केली होती. त्यास उत्तर देताना नांगरे-पाटील यांनी पोलिस पाटलांना पिस्तुल न देता सिंगल बोअर किंवा डबल बोअरच्या रायफल घेण्यासाठी परवाने देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण या रायफल स्वत: खरेदी करावयाच्या आहेत. पोलिस पाटील हे पद मानाचे असून कुणीही हे काम मानधनासाठी करीत नाही आणि पोलिस पाटील हे रायफल विकत घेण्याइतपत सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलिस उपधीक्षक प्रितम यावलकर, सहायक पोलिस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे आदी उपस्थित होते. 

Tags : Solapur, Solapur News, Vishwas Nangare Patil,  Learned, Peoples, Problems


  •