Sun, Apr 21, 2019 02:03होमपेज › Solapur › विजयदादा सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीत उत्साह

विजयदादा सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीत उत्साह

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यापासून काहीसे अलिप्त झालेले खा. विजयसिंह  मोहिते-पाटील मागील काही दिवसांपासून पक्षात चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण असून जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्यासह सर्वच तालुका कार्यकारिणी आणि पदाधिकारीही जोमाने कामास लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये उघड-उघड पवार आणि मोहिते-पाटील असे दोन गट होते. मोहिते-पाटील विरोधकांना पक्षाच्याच वरिष्ठांकडून फूस लावली जात असल्यामुळे खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचा गट नाराज होता. मात्र तरीही पक्षावरील निष्ठा कायम ठेऊन मोहिते-पाटील यांचा गट पक्षाचे काम करीत होता. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पानीपत झाल्यानंतरही माळशिरस तालुक्यात मात्र राष्ट्रवादीने आपली ताकद  दाखवून दिली आहे. मोहिते-पाटील गटावर मात करण्याच्या नादात राष्ट्रवादीचेच नुकसान होत असल्याचे दिसून येताच आ. अजित पवार यांनी मागील महिन्यात सोलापूर येथील मेळाव्यात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसह सर्वांचेच कान पिळले होते. त्या मेळाव्यास खा. मोहिते-पाटील यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर मात्र जिल्हध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात फिरून पक्षाची पुर्नबांधणी जोमाने सुरू केली आहे. तालुकावार कार्यक्रम निश्‍चीत करून विविध आंदोलने  हाती घेतलेली आहेत. प्रत्येक तालुक्यात नवीन कार्यकारिण्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे या नियुक्त्या करीत असताना मोहिते-पाटील यांना विश्‍वासात घेतल्याचे  दिसून येत आहे. त्यामुळे सध्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पारंपारिक पवार निष्ठांसह कट्टर मोहिते-पाटील समर्थकांचेही वर्चस्व दिसून येत आहे. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडीमध्ये मोहिते-पाटलांचा प्रभाव दिसून येत आहे.  तसेच हे नूतन पदाधिकारीही जोमाने कामास लागले आहेत. खा. विजयदादा काही दिवसांपासून पक्षाच्या बैठकांना आवर्जुन उपस्थित राहिले आहेत. पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ माळशिरस  तालुक्यात करीत असताना 10 हजार नोंदणीचे उद्दीष्ठ ठेवले आहे. आगामी लोकसभा निवडणुका दीड वर्षांवर आली असून राज्य व केंद्र सरकारविषयी जनतेमध्ये चांगलीच नाराजी दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत बालेकिल्ला शाबूत राखण्याकरिता मोहिते-पाटील यांचे सक्रिय होणे पक्षासाठी निकडीचे होते. खा. मोहिते-पाटील सक्रिय झाल्यामुळे  कुंपणावर असलेल्या पक्षातील नेत्यांनाही सूचक ईशारा मिळाला आहे. विजयदादा सक्रिय झाल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. विद्यार्थी, युवक, महिला, किसान, अल्पसंख्याक, ओ.बी.सी. अशा सर्वच शाखांची पुनर्रचना चांगल्या प्रकारे झाल्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीची टीम तगडी दिसू लागली आहे.आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीलाच अच्छे दिन येतील असे शुभसंकेत या घटनांच्या माध्यमातून दिसू लागले आहेत.