Fri, Apr 26, 2019 17:39होमपेज › Solapur › जड वाहतुकीचे बळी रोखण्यासाठी रिंगरूट, उड्डाणपुलाला गती हवी 

जड वाहतुकीचे बळी रोखण्यासाठी रिंगरूट, उड्डाणपुलाला गती हवी 

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 6:34PMवाहतूक व्यवस्था : रामकृष्ण लांबतुरे 

शहराची वाहतूक व्यवस्था ही देशात कोठेही नाही इतकी खराब वाहतूक व्यवस्था असल्याची टीका शहरातील एका नामवंत उद्योगपतीने केली. तेही पत्रकारांच्या एका कार्यक्रमात. ते खरेही आहे. त्यामुळेच जड वाहतुकीत बळी गेलेल्यांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत लागोपाठ दोनजण मृत्युमुखी पडले. यावर आळा घालण्यासाठी फक्‍त घोषणा झालेल्या रिंगरूट आणि प्रस्तावित दोन उड्डाणपुलांच्या प्रकल्पाला गती देण्याची गरज आहे. 

महामार्ग शहर हद्दीतून जात असल्याने जड वाहतुकीचा फटका अनेकांना सहन करावा लागतो. यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. 
दररोज दुपारी व सायंकाळी एकदम वाहने शहरात प्रवेश करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होते.  शहर विकास आराखड्यामध्ये  शहरातून महामार्ग रद्द करून ते शहराबाहेरून काढण्यात येणार आहेत. पूर्वी सर्व महामार्ग शहराबाहेर होते. परंतु नागरी वस्त्या वाढल्या अन् महामार्ग शहरात आले. शहर नियोजनात रिंगरूट दाखविला. प्रत्यक्ष दहा वर्षांनंतरही तो अस्तित्वात आला नाही. 91 किलोमीटरच्या रिंगरूटची घोषणा झाली. मात्र कामाचा एक दगडही उचलला गेला नाही. तीन टप्प्यांत काम होणार असून पहिल्या टप्प्या हा मार्चपासून सुरू होणार होता. आज  सहा महिने होऊन गेले कामाचा पत्ताच नाही. केगाव-बाळे-हत्तुर (21 कि.मी.), हत्तुर-बोरामणी (26 कि.मी.), बेलाटी-मंगळवेढा- बसवेश्‍वरनगर (36 कि.मी.) असा हा प्रस्तावित रिंगरूट मार्ग आहे. 

नियोजन नसल्यानेच  शहरातील अपघातांमध्ये एकापाठोपाठ एक मृत्युमुखी पडत आहेत. बोरामणी-मुळेगाव-कुंभारी-होटगी-हत्तुर (एकूण 25.38 कि.मी.) या कामामुळे हैदराबाद-विजापूर महामार्गाबरोबरच सोलापूर-तुळजापूरमार्गे येणारी वाहने मार्केट यार्ड चौकातून येण्याऐवजी थेट बाह्यवळणावरून हत्तुरकडे जाऊ शकतील. रस्त्याच्या चारही बाजूंचे महामार्ग पूर्ण करतानाच रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात बोरामणी ते हत्तुर, हत्तुर ते बाळे असा मार्गआहे. हे मार्ग पुढे हैदराबाद रस्त्यावर बोरामणी येथे जोडले जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने उभारण्यात येणार्‍या शहरातील दोन उड्डाणपुलांसह अनेक मार्गांचे भूमिपूजन 26 मार्च 2016 रोजी मंत्र्यांच्या उपस्थित झाले. मात्र प्रत्यक्षात कामाची एक कुदळही पडली नाही. सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते सात रस्ता व पुढे विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवन या मार्गावर सहा किलोमीटरचा उड्डाणपूल तसेच बोरामणी नाका ते कुमठा नाका ते पत्रकार भवन असा साडेसहा किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.