Tue, Jun 18, 2019 20:17होमपेज › Solapur › आधुनिक काळातही वासुदेव लोककलेची जोपासना

आधुनिक काळातही वासुदेव लोककलेची जोपासना

Published On: Sep 02 2018 1:18AM | Last Updated: Sep 01 2018 8:52PMबार्शी : गणेश गोडसे

छत्रपती शिवाजी महाराजांसह हजार-बाराशे वर्षांपूर्वीच्या काळापासून  समाजात अनन्यसाधारण महत्त्व  असलेल्या वासुदेवाच्या लोककलेला जोपासण्यासाठी जनाधार गरजेचा असून तसे झाले तरच लोप पावत चाललेली वासुदेव (लोककलाकार) ही कला टिकणार आहे. शासन स्तरावरूनही या लोककलेला जतन करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. 
 ग्रामीण भागात भल्या पहाटे गल्लीत येऊन मंजुळ पोवा वाजवून घरोघरी जाऊन 

वासुदेव हरी वासुदेव हरी ।
सकाळच्या पारी आली 
वासुदेवाची स्वारी ।
सीता सावली माता 
दान करी वासुदेवा ।
श्रीकृष्ण घ्या सखा 
नाही होणार तुला धोका ॥

असा हरिनामाचा  गजर करून अभंग, गवळणी गाऊन व हरिनाम घेऊन दान मागून त्यावर  आपल्या कुटुंबीयांची उपजीविका करणारा लोककलाकार म्हणजेच वासुदेव. जनजागृती करीत व संस्कार टिकून ठेवण्याचे व आई, वडील, सासू, सासरा यांच्यासह संपूर्ण कुळाचा मुखातून उद्धार करून मोबदल्यात मिळेल ते घेऊन वासुदेव समाधान मानतो. डोक्यावर मोरपिसांची टोपी, अंगावर तीन गुंड्यांचा शर्ट, पायात धोतर, गळ्यात भगवा शेला, हातात टाळ अथवा चिपळ्या, खिशात पोवा, गळ्यात माळा, कपाळी टिळा, गळ्यात झोळी अशा वेशभूषेत तोंडातून सतत गवळण म्हणून श्रीकृष्ण भक्ती  जोपासणारा लोककलाकार म्हणजेच वासुदेव.

पिढ्यान पिढ्या ही लोककला जोपासली जाते. काही ठिकाणी मानसन्मानाबरोबरच चांगला पाहुणचार मिळत असला तरी नवीन पिढीला वासुदेव हा प्रकारच माहित नसल्याने अपवादात्मक वेळी तरूण पिढीकडून  अवमान होत  असल्याची खंतही त्या लोककलाकारामधून व्यक्त केली जात आहे. मात्र, ही परंपरा  असल्यामुळे तिचे जतन करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जातो. श्रीकृष्ण भक्त असलेल्या या लोककलाकारांना अजूनही सर्वच सोयीसुविधांपासून कोसो दूर रहावे लागत आहे.  शासन स्तरावर हे वंचित राहिले आहेत. ना घर, ना मानधन, ना अर्धे तिकीट असे काहीच या कलाकारांच्या वाट्याला येत नाही. शासनाने सांगितले म्हणून योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव देण्यात आला; मात्र त्याला मंजुरी मिळाली नसल्याचे आडसूळ यांनी सांगितले.

आम्हाला शासन स्तरावर कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाही. मिळणार्‍या दानामधून पोट भागत नाही. सरकारने मानधन द्यावे व त्यासाठीच्या अटी शिथील कराव्यात. 


- बालाजी आडसूळ (वासुदेव, उस्मानाबाद)