Sat, Sep 22, 2018 15:14



होमपेज › Solapur › अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गर्भपात

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गर्भपात

Published On: Mar 21 2018 11:01PM | Last Updated: Mar 21 2018 10:52PM



वैराग : प्रतिनिधी 

जीवे मारण्याची धमकी देऊन  अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून चार महिन्यांचा गर्भपात  केल्याप्रकरणी तुळजापूर येथील एका महिला डॉक्टरसह चार जणांविरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा रामचंद्र गाटे, बाळराजे ऊर्फ रविराज विठ्ठल गाटे, मारुती रामचंद्र गाटे (सर्व रा. सारोळे), डॉ. सिंधू कदम (अंबाई हॉस्पिटल, तुळजापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी महिला आपल्या दोन मुली व दोन मुलांसह कासारी (ता. बार्शी) येथे राहते. फिर्यादीचा नवरा सारोळे (ता. बार्शी) येथील बाळासाहेब सदाशिव बुद्रुक यांच्यात सालगडी म्हणून कामास आहे. 

पीडित मुलगी जून महिन्यात शेतात शेळ्या राखत असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रामचंद्र गाटे हा त्या ठिकाणी आला. त्याने पीडित मुलीस शेजारीच असलेल्या उसाच्या शेतात 
नेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. त्यावेळी कृष्णा गाटेचा भाऊ मारुती गाटे त्याठिकाणी आला. त्याने झाला प्रकार कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीचे आई-वडील गावाला गेले असता त्यावेळी पुन्हा सलग आठ दिवस मालकाच्या शेतात नेऊन पीडित मुलीवर बलात्कार केला. याबाबत पीडित मुलीचे वडील विचारण्यास गेले असता गर्भ खाली कर नाहीतर जीवे मारून टाकीन म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली.

पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिचे आई-वडील तुळजापूर येथील अंबाई हॉस्पिटल येथे 20 ऑक्टोबर 2017 रोजी  घेऊन गेले. त्यावेळी सदर मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याचे डॉ. सिंधू कदम यांनी सांगितले. डॉ. कदम यांनी जबरदस्तीने पीडित मुलीचा गर्भपात केला. काढलेला गर्भ प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये पीडितेच्या आईच्या हातात दिला. गर्भ असलेली पिशवी घेऊन सर्वजण कासारी येथे आले असता त्याठिकाणी कृष्णा गाटे व बाळराजे गाटे हे दोघे आले. त्यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन सदरचा गर्भ शेतात पुरण्यास सांगितला. कृष्णा गाटे याने पीडित मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिच्याबरोबर लग्न करतो, असे आमिष दाखविले. पुरावे नष्ट कर, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.या घटनेचा पुढील तपास सपोनि सचिन पत्रे करीत आहेत.